२८ मार्च २००९

मुजरा

वेदना हृदयातली ती परत तुज बघताच आली
अन मनाच्या आरशाची पारदर्शी काच झाली

निघुनी जो गेलास तेव्हा वळुनीही ना पाहिले
आज कैसी मैफिलीची फिरुनी तुजला याद आली ?

मूक झाली गजल माझी,शब्दही हरवून गेले
सूरराणी रागिणीची तान पण घेता न आली

छेडिल्या तारा सतारीच्या तरी झंकार नाही
द्यावया मुजरा तुला निस्तब्ध ही जणु रात झाली

ओळखीचे स्मित दिले तू चषक देता छलकता
मेघ आकाशात नसता ही कशी बरसात झाली ?

कुष्ठ्ग्रस्तांची अपेक्षा

कींवभर्‍या नजरेने बघता
जाता येता आम्हाकडे
तुमच्याकडुनी काहि नको,
आम्हि देवा घालितसुं साकडे

पहावयाला नेत्र मिळावे
बोलायाला जिव्हा हवी
हसावयाला ओठ दोन अन
ओठांसाठी गाणी हवी

देवाचे कुणि नाम घेइ तर
कान हवे ऐकाया दोन
चालायाला हवित पाउले
अन जोडाया करतल दोन
……

हे सारे उपलब्ध तुम्हाला
आम्हापाशी काहीं नसे
लाभो तुम्हाला धनराशी
ध्यास तयाचा आम्हा नसे

दोनच घास मिळाले जर तरी
विझेल पोटातिल ठिणगी
तुमच्यासाठी राहु द्यात मग
धान्याने भरली कणगी

२७ मार्च २००९

'अंडयाचे बंड'

अंडयाचे बंड

एक होतं तरतरीत गोरगोमटं अंडं
कशावरून तरी एकदा केलं त्यानं बंड

बावर्चीच्या हातांतून घेतली खाली उडी
कोथिंबीर अन मिरच्यांच्या टोपलीत मारली दडी

हळव्या अंत:करणाच्या मिरचीला आली दया
कोथिंबिरीच्या लुसलुशीत पानांनी केली माया

कांद्याच्या पण डोळयातून वाहू लागले पाणी
मीठ म्हणाले “जखम असेल तर लावा हळद कोणी”

अंडयाने सांगितले “चकणा बावर्ची काय बोलतो
उकडुन माझ्या पोटातला गोळा काढिन म्हणतो”

सगळे झाले अंडयाच्या भोवताली गोळा
म्हणायला लागले “बावर्चीकडे कर काणा डोळा”

मोर्चा नेला सगळयानी मग बावर्चीकडे थेट
बावर्चीने घालुन दिली मालकिणीची भेट

सगळयाना एकत्रित पाहुन मालकिण झाली खूष
पिता पिता बाजूला तिने ठेवला मँगो ज्यूस

म्हटली “थँक्यू” सगळयाना घेतल्याबद्दल भेट
बावर्चीच्या कानात बोलली “कर झकास आमलेट”

२६ मार्च २००९

वाढदिवस

कधी आलो? कोण्या रोजी? किती राहीन टिकून?
कोण जाणे अचानक कधी जाईन निघून
किती जगलो तयाचा हवा कोणा इतिहास?
वाढदिवसाचा मग कशापाई अट्टाहास?

येतेवेळी कोणासवे काही आलेले नसते
जातेवेळी पण नाही काही संगे नेता येते
कशासाठी मग हवी भेटी–देणग्यांची रास?
अंती उरते न काही हवा कशाला हव्यास?

जन्माआधी काय खाई कोणालाही नाही ठावे
मृत्यूपरांतचे पण कोडे कसे उमजावे?
तीळतांदळाचा पिण्ड फक्त कावळयांचा घास
पंचपक्वान्नांचा मग घ्यावा कशासाठी ध्यास?

घालवावी मुलाबाळांसवे वर्षें उरलेली
नातवंडांनी असावे बागडत भोवताली
कौतुकाने पाहताना घ्यावा शेवटचा श्वास
आणि करावे प्रयाण अखेरीच्या प्रवासास

२५ मार्च २००९

शेवंती


अग शेवंती‚ शेवंती‚ किती फुललीस बाई
तुला आणले जिने ती आज बघायला नाही*
तिला अर्पियले होते फूल पहिलेवहीले
किती अभागी तू पोरी‚ तिने नाही देखियले

अग रागावू नकोस, तिला बरे नव्हते ना?
तुझे कळयांचे वैभव तिने पाहिले होते ना?
खात्री बाळग मनात‚ आनंदली असती ती
फुले ओंजळी भरून तिने चुंबिली असती

रोज टपोरेसे एक फूल खुडतो तुझे नि
तिच्या तसबिरीवरती देतो अल्गद ठेवुनी
मग पाहतो डोळ्यात‚ तिचे हसू दिसते ते
जाणवते‚ मन तिचे कौतुकाने ओसंडते

नाही हजर समक्ष जरी बोलाया तुझ्याशी
आणि बाळांना या तुझ्या धरायला हृदयाशी
तरी खंतावू नकोस‚ अशी फुलतच रहा
आहे नक्की येणार ती‚ तिची वाट जरा पहा**
*माझ्या दिवंगत पत्नीने शेवंतीचे इवलेसे रोप भारतातून आणून लावले होते।
**ती माझी नात बनून पुन्हा जन्म घेणार आहे अशी कल्पना.

२४ मार्च २००९

'साथ'

साथ माझी प्रिये आज का सोडली ?

जेथ मी जायचो यावया तूं हवे
आज तूं मात्र मज का न नेले सवे ?
एकतेची शपथ आज का तोडली ?

झुंजलो जीवनाशी सदा जोडिने
सुख असो दु:ख वा सोशिले गोडिने
आज खेळी हि अर्ध्यात का सोडली ?

कितिक नावे तुझी, ‘ओ’ तरी यायची
शीळ मी घालता साद तू द्यायची
का सखे ही प्रथा आजला मोडली ?

एकही दिवस ना बोलणे सोडले
सलग हे आठ दिन मौन का धारले ?
त्याच मौनात मग का कुडी सोडली ?

साथ माझी प्रिये आज का सोडली?

‘गीत हे हळुवार माझे’

चन्द्रम्याच्या या रुपेरी चांदण्याने भीज तू
गीत हे हळुवार माझे पांघरोनी नीज तू

मंदश्या वाय्रासवे ही रातराणी डोलते
डोलताना सुरभीचे भांडार अपुले खोलते
उधळुनी देते सुगंधा, त्यात थोडी भीज तू
गीत हे हळुवार माझे पांघरोनी नीज तू

करपुनी टाकीत सॄष्टी दिवसभर जो कोपला
तो रवीही चांदण्याच्या गारव्याने झोपला
गारव्यामध्ये कशाला आठवावी वीज तू?
गीत हे हळुवार माझे पांघरोनी नीज तू

रात्र वैरी कधिच नसते, जाण तिज तू निजसखी
राहुनी जागी नको होऊ विसाव्या पारखी
काळज्या सोडून साया कर रिते काळीज तू
गीत हे हळुवार माझे पांघरोनी नीज तू

२३ मार्च २००९

हरएक गज़ल माझी

सखये, नको विचारू ही व्यर्थ पहेली,
… हरएक गज़ल माझी कोणास वाहिलीॽ

भ्रमरापरी कधी मी स्वच्छंदसा भटकलो
पण भारल्या क्षणी या कमलात बंद झालो
प्रीती कशी म्हणावी अव्यक्त राहिली ॽ
… हरएक गज़ल माझी कोणास वाहिलीॽ

मदिरा समर्थ नव्हती मज उन्मनी कराया
तव विभ्रमात होती ती जादुगरी माया
माझी अशी दशा का नाहीस पाहिली ॽ
… हरएक गज़ल माझी कोणास वाहिलीॽ

भुवया कमान झाल्या अन नेत्रबाण सुटले
शरविद्ध हृदय माझे शतधा विदीर्ण झाले
छबि लोचनी कुणाची माझ्या स्थिरावली?
… हरएक गज़ल माझी कोणास वाहिलीॽ

सखये, नको विचारू ही व्यर्थ पहेली,
… हरएक गज़ल माझी कोणास वाहिलीॽ

२२ मार्च २००९

'ग्रीष्म'

ऋतुचक्र फसुनी आहे, तल्खीस अंत नाही
ग्रीष्मातल्या तरीही जगण्यात खंत नाही

होती उमेद धरिली लंघीन मेरू पायी
रक्ताळलो परंतु काटयात ठायी ठायी
मी वेचिल्या फुलांना उरला न गंध काही
ग्रीष्मातल्या तरीही जगण्यात खंत नाही

पाऊल तापलेले कुरवाळता मी पाही
मम भार साहवे जी, ती तडकली धराही
मी शोधिला परंतु फुलला वसंत नाही
ग्रीष्मातल्या तरीही जगण्यात खंत नाही

ना वांछिले बगीचे, सुम­पर्ण गालिचेही
वर्षाव अत्तराचा ना इच्छिला कदाही
पण या सदाफुलीला कसला सुगंध नाही
ग्रीष्मातल्या तरीही जगण्यात खंत नाही

२१ मार्च २००९

‘मदहोशी’

जागे नको करू ना, स्वप्नात राहु दे
धुंदीत वारुणीच्या ही रात जाउ दे

अधरातली तुझ्या दे मदिरा अजून थोडी
प्याल्यातल्या सुरेला येते तिची न गोडी
हा मख्मली करांचा काढू नकोस विळखा
झुलुपात रेशमी या गुंतून राहु दे
धुंदीत वारुणीच्या ही रात जाउ दे

हळुवार चुंबुनीया उघडवु नकोस डोळे
प्रतिबिंब तव मुखाचे मी बंद त्यात केले
राणी तुझ्या मिठीने उबदार या निशेची
जादुभरी खुमारी वाढून राहु दे
धुंदीत वारुणीच्या ही रात जाउ दे

गातील पाखरे गे जेव्हा पहाट गाणी
अन दीप चांदण्यांचे मंदावतील राणी
उमलूनिया कळ्यांची होतील फुले तेव्हा
झुळुकेस गंध त्यांचा घेऊन येवु दे
धुंदीत वारुणीच्या ही रात जाउ दे

१६ मार्च २००९

’गीत गाऊ नको’

स्वप्न दावू नको, जीव लावू नको
प्रीत सांगेलसे गीत गाऊ नको

वाट मी पाहिली होउनी बावरी
शब्द होते तरी स्तब्ध आसावरी
पाहता पाहता सांज झाली आता
दर्द छेडीलसा सूर लावू नको

शीळ ही वाढवी काळजाची गती
पीळ पाडी जिवा, स्वॆर होई मती
बांधल्या भावना, आवरोनी मना
बांध फोडीलसा पूर वाहू नको

अंतरंगी कधीचाच आलास तू
अश्रुरूपे कधी व्यक्त झालास तू
रूप घेऊनिया, मूर्त होऊनिया
पापणीपाठुनी आज येऊ नको

स्वप्न दावू नको, जीव लावू नको
प्रीत सांगेलसे गीत गाऊ नको

१४ मार्च २००९

‘प्रियतमे’

खुलती बटा गालांवरी‚ मऊ रेशमाच्या झालरी

गोरा गुलाबी हासरा चेहरा तुझा सखी लाजरा
कचभार जो स्कंधावरी आषाढ घन जणू अंबरी
खुलती बटा गालांवरी

क्षणमात्र उचलशि पापण्या‚ शर येती हृदया विंधण्या
घायाळ या जीवास दे‚ झुलुपांची शीतल सावली
खुलती बटा गालांवरी

डरणार ना मरणास मी जर आस माझी हो पुरी
मजसाठी तव नेत्रांतुनी बस एक अश्रू झरे तरी
खुलती बटा गालांवरी

मजला नको जीवन पुन्हा‚ निष्प्रेम जगणे हा गुन्हा
माझ्या स्मॄतीला मात्र दे जागा जराशी अंतरी
खुलती बटा गालांवरी


अर्पणपत्रिका

“ के ”
सांगायचो‚ हळू बोल.
लडी उलगडतील अन्
भळभळ खाली सांडतील शब्द अशी भरभर बोलू नकोस.
ठेचकाळतील ते‚ दुखावतील कदाचित‚
मग त्यांची समजूत काढायला
अश्रूंना ओघळावे लागेल माझ्या.
अन् ओघळलेल्या अश्रूंबरोबर वाहून गेले तुझे शब्द तर
माझ्या वाटयाला काय राहील ?
कुठून शोधून आणू त्यांना ?
तेच घडले न आता ?
बोल ना कुठून शोधून आणू ?
सांग ना‚ बोल ना. आता का गप्प झाली आहेस ?


के,
माझे हे गान
तुलाच अर्पण
पारिजातकाखाली बसली असशील तेव्हा
तिथे गुणगुणावेस तू म्हणून.