१८ जुलै २००९

कशी नीज येईल? मजला कळेना

कशी नीज येईल? मजला कळेना
तुझ्या आठवांना उतारा मिळेना
कशी नीज येईल? मजला कळेना ॥धृ॥

कथापुस्तकांची उलटतात पाने
मना मोहवीती न मंजूळगाने
कशाहीमधे चित्त माझे रुळेना
कशी नीज येईल? मजला कळेना ॥१॥

रिकामी तुझ्या बाजुची शेज आज
कुठे हरपले ते तुझे प्रेमकूज
बदलणे कुशी फिरफिरुनि हे टळेना
कशी नीज येईल? मजला कळेना ॥२॥

जरी ठेवली उघडुनी मद्यशाला
पुन्हा भरभरूनी रिकामाच प्याला
किती संपले काहि गणना जुळेना
कशी नीज येईल? मजला कळेना ॥३॥

०९ जुलै २००९

मरणाचे भय धरू नको

जगण्यावर कर प्रेम आणखी मरणाचे भय धरू नको
लढा जीवनाचा लढताना हतबल होउन हरू नको

जमिनीवरती पाय रोवुनी नक्षत्रांना कवेत घे
विजिगीषू वृत्तीस तुझ्यातिल बळेबळे आवरू नको

मनात जे ते प्राप्त करावे, रास्त जरी, धरणे बाणा
साधनशुचिता सांभाळावी या नियमाला विसरु नको

भान वास्तवाचे ठेवावे धडा नित्य हा घे ध्यानी
नियती अपुल्या हाती नसते, हमी फुका कधि भरू नको

अपमानाला ठेव मनामधि अन मानाची गाथा गा
गाथा गाताना पण लवही अतिशयउक्ती करू नको

खलवृत्तीने लिप्त नसे जग, नेक अनेक इथे असती
निवडुंगावरदेखिल येती फुले तयां विस्मरू नको

०२ जुलै २००९

मी इथे खुशाल आहे

थंडी, वादळ, ऊन, पाऊस, निसर्गाची सारी हौस
सर्वांपासून रक्षण करणारी माझ्याकडे शाल आहे
वार्‍या सांग सार्‍याना, मी इथे खुशाल आहे

माझ्यासाठी प्रेमाची ही शाल त्यांनीच विणली होती
आलो तिथून इथे तेव्हा बरोबर मी आणली होती
एकटेपणाच्या अंधारात ही धीर देणारी मशाल आहे
वार्‍या सांग सार्‍याना, मी इथे खुशाल आहे

अरे तिथे सार्‍याना माझा एवढा निरोप सांग
उदंड प्रेम दिलेत म्हणावे, कधीच फिटणार नाहीत पांग
प्रेमाच्या त्या शिदोरीवरच माझी इथली वाटचाल आहे
वार्‍या सांग सार्‍याना, मी इथे खुशाल आहे

स्वर्लोकीच्या वाटिकेतून तसाच वाहू नकोस थेट
तिथे आई, दादा माझे, त्यांना जरूर जरूर भेट
त्यांचे आशिर्वाद, वार्‍या, हीच माझी ढाल आहे
आर्जवून त्यांना सांग, मी इथे खुशाल आहे

करायचे त्यांच्यासाठी तेव्हा हात होते रिते
समृध्दीचे दिवस आले तेव्हा दोघे नव्हते इथे
काहीच दिले नाही त्याना....
काहीच दिले नाही त्याना, मनात चुकचुकती पाल आहे
तरीदेखिल त्याना सांग मी इथे खुशाल आहे

आणि माझी सहचारिणी... तीही तिथेच स्वर्गात रहाते
घाईघाईने गेली पुढे, म्हटली, "तुमची वाट पहाते"
पुन्हा भेटावी म्हणून उभे डोळ्यांमध्ये प्राण
नको सांगू तिला सारे, तुला आहे माझी आण

आठवणींनी कासाविस असा माझा हाल आहे
फक्त एवढेच सांग तिला, मी इथे खुशाल आहे