१२ ऑगस्ट २०१०

आई मला लागलीये भूक खूप खूप

आई मला लागलीये भूक खूप खूप
वरणभातावर घाल खूप सारं तूप

आजोबा भरव्तिल करून गोलगोल घास
अग त्यांच्या घासाना चव अस्ते खास

किती छान कुस्करून मऊ कालवतात
मज्जा येते जाताना गुट्टुक्क पोटात

मधनंच लाव्तिल घासाला लोणच्याचं बोट
खाताखाता होऊन जाईल टुम्म माझं पोट

देईन बर का नंतर मी ढेकर "ओब्ब्बा"
हसून "शाब्बास बंटीबाबा" म्हण्तिल आजोबा

कल्लेवाल्या माशाला फुटल्या मिश्या दोन

बनुताई आता मोठ्या झाल्यात. बंटीबाबाला कडेवर घेऊन एंजल मासे असलेल्या फिश टँकसमोर हे गाणं म्हणून त्याला रिझवतात. प्रत्येक कडव्यानंतर "है" म्हणत पहिलं कडवं रिपीट करताना बंटीबाबाला हळूच एक झोका देतात तेव्हाचं बंटीबाबाचं खिदळणंही ऐकण्यासारखं असतं.

कल्लेवाल्या माशाला फुटल्या मिश्या दोन
मनीमाउनं केला त्याला ट्रिंग ट्रिंग फोन
है........

"अरे फिशी फिशी, तुला आली कशी मिशी?
टोचेल न रे मला, मग खाऊ तुला कशी?"
है........

मासा हसला गडगडून म्हटला "द्दे ट्टाळी,
मनीमाऊ, खा आता फुटासची गोळी"
है.......

पाण्यात बुडवुन पंजा बसली मनीमाऊ टपून
चान्स बघता बघता गेली तिथच तशीच झोपून
है.......

२३ एप्रिल २०१०

मध्यपूर्वेतील IBM (इन्शाल्ला बुक्रा मुम्किन)

अरबी देशांमध्ये, जिथे माझे पाव शतकाहून जास्त काळ वास्तव्य आहे, सरकारी कचेर्‍यांमध्ये जो अनुभव येतो तो इथल्या मित्रांच्या एका मैफिलीत मी वर्णन केला होता. अपरिचित उर्दू-अरबी शब्दांचे अर्थ आधीच देतो म्हणजे कविता वाचताना बुचकळ्यात पडावे लागणार नाही.

सियासी मक्तब : सरकारी कचेरी
रवैय्या: प्रघात
लाजिम: आवश्यक
अस्सलाम अलैकुम, वालैकुम सलाम: तुम्हाला नमस्कार, तुम्हाला प्रति-नमस्कार
गर: जर, अगर
हमवतनी: त्याच्याच देशाचा नागरिक
लब: ओठ
ईमान: धर्म
पेशानी: कपाळ
या हाला, श्लोनक, तैय्यिब कैफिलहाल’: हॅलो, काय रागरंग? ठीक? काय हालहवाल?
लफ्ज: शब्द
कहवा वल्ला चाय ?: काय घेणार? वेलचीची कॉफी की चहा?
मर्रा मर्रा: पुन्हा पुन्हा
मुहंदीस: इंजिनीयर (पण सगळ्यानाच 'साहेब' या अर्थी म्हणायचे संबोधन)
नाम्: अरबीमधे 'हो' (येस्)
पैगाम: संदेश
इन्शाल्ला : अल्लाची इच्छा असेल तर
बुक्रा : उद्या
मुम्किन: शक्य आहे
मामुष्किल : काही कठीण नाही
मास्सलाम: ठीक, निघा आता, नमस्कार !
'इन्शाल्ला बुक्रा मुम्किन मामुष्किल मास्सलाम'चा एकत्रित अर्थ 'आज नाही, जमल्यास उद्या बघू, निघा आता'.)

वाचा तर आता,


किसी सियासी मक्तबमे जो रहता है रवैय्या
बता रहा हूं इसीलिये के तुम्हे सबक हो भैय्या
सुनके याद रखो लाजिम है सबको कहे 'सलाम'
अस्सलाम अलैकुम, वालैकुम सलाम

मिलना है जिन जनाबको वो समयपे ना आएंगे
आएंगे तब मोबाइलपे बोलते रह जाएंगे
देखेंगे जब उठाके आंखे कहेंगे सिर्फ 'सलाम'
अस्सलाम अलैकुम, वालैकुम सलाम

बाद तुम्हारे आनेवाला गर हमवतनी होगा
इस कोनेसे उस कोनेतक लब फैलाएगा
तुमसे पहले उसको मिलना यहि इनका ईमान
अस्सलाम अलैकुम, वालैकुम सलाम

गले मिलेंगे, चूमेंगे पेशानी, नाक और गाल
पूछेंगे 'या हाला, श्लोनक, तैय्यिब, कैफिलहाल?
दस मिनटोंतक लेते रहेंगे इन लफ्जोंसे काम
अस्सलाम अलैकुम, वालैकुम सलाम

इसके बाद पूछेंगे 'कहवा वल्ला चाय?'
मर्रा मर्रा कहवा लेके फिर मांगेगे चाय
इतनेतक भी मुम्किन है ना निकले कामका नाम
अस्सलाम अलैकुम, वालैकुम सलाम

घडी दिखाए आके यहाँ दो घंटे होने आये
शायद भूल गये होगे तुम यहाँ किसलिये आये
मुहंदीस जो कहते जाते तुम बस् कहना 'नाम्'
अस्सलाम अलैकुम, वालैकुम सलाम

इसमेसे यदि मिलेगा मौका कह डालो जो काम
मिल जाएगा सुननेको फिर हरपलका पैगाम
'इन्शाल्ला बुक्रा मुम्किन मामुष्किल मास्सलाम'
अस्सलाम अलैकुम, वालैकुम सलाम

०५ एप्रिल २०१०

लमाण

आज हितं उद्या तितं, कुटं परवा तेरवा ?
कोन कशाला पुसंल ? हाय कुनाला पर्वा ?

जिनं हाय सटवाईच्याच हातामदलं खेळनं
कुनाच्याबी बा ला न्हाई आलं भरमन (भ्रमण) टाळनं

जवा गुर्‍हाळ सप्पल तवा पालं उठायची
आन् अंगातली हाडं जरा ज्यादाच वठायची

पाय बांधलं गाडाव जसं खुरडत खुरडत जाई
ह्योबी तश्याच चालीनं वाट रखडत र्‍हाई

मुंडी खाली घालूनच हाये जायचं व्हाऽत
कागदकपटा जाई जसा पानलोट बहावात

कवा पडला पान्यात आणि कुटं जानं हाये
ठावं न्हाई त्येला ! तसंच ह्येचंबी जिनं हाये

जातीला म्हन्त्यात चोरटी, पन प्वाट खपाटीला
कुठं गेला सांगा मं त्यो कंदी मारल्याला डल्ला ?
आ ? सांगा की वो !

१४ मार्च २०१०

रे मीत,

रे मीत, ऐक, गाऊन गीत मी करिते अंतर् खुले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले

आनंदी अथवा आर्त, कसाही असो सूर गाण्याचा
मन दिसते त्यातुन, जसा दिसे तळ निर्मळ पाण्याचा
हे उमजुन घे अन ऐक रे जरा गीत गाइलेले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले

तू कधीच नव्हते मला मानले अपुली जीवनसाथी
अन् तरिही होते लोभावुन मी तुझ्याच साथीसाठी
पण सनईच्या त्या तारस्वरानी स्वप्न हिरावुन नेले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले

तो तुझा तृप्त अन् हसरा चेहरा बघताना त्या क्षणी
परतवले होते निर्धाराने मी डोळ्यातिल पाणी
अन सुरेख निवडीचेही औक्षण होते मी केलेले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले

या शब्दसुरामधि समावलेले अंतर्मन उमगावे
अन् तुझ्या अंतरी मीत म्हणुन तरि स्थान मला लाभावे
हे एक मनोगत केवळ आहे मनात बाळगलेले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले

०६ मार्च २०१०

फुला रे फुला

फुला रे फुला
तुला हातांचा झुला
पंखा नाही तरी पण
वारा बघ आला

वार्‍याच्या बरोबर
डोल जरासा
आई आणि बाबांशी
बोल जरासा

"अ अ" नि "ब ब"
"ई गि ग्गि गिक्"
रडु नको सारखं
हसायला शिक

आजोबांचं पोट
घोड्याची पाठ
हो स्वार पण तरी
मान ठेव ताठ

हाताची डावली
जर्राशिच मार
चाल्वु नको पायाची
साय्कल फार

बरऽ आता जरासा
हो उपडा
दाखव उचलुन
नागाची फडा

दमला नं आता?
मऽ मांडीवर या
चिडिचुप गिडगुडुप
झोपुन जा

०३ मार्च २०१०

नीज नीज बाळा

कशी येत नाही अजुनी नीज तुला बाळा
गडद रात्र झाली आता तरी पुरे चाळा ॥धृ॥

चिऊ काउ सारे सारे झोपले कधीचे
लावतोस छकुल्या तूही सूर जांभईचे
का रे तरी झोप नाही पांघरीत डोळा ॥१॥

सानुल्या फुला तू आता मीट पाकळ्या या
जरा दे विसावा अपुल्या पंख आणि पाया
आणि पाखरा ये माझ्या बिलगुनी कुशीला ॥२॥

उघड हळुच पापण्याना सकाळी सकाळी
चिमुकल्या मुखाने मजला 'अअ' साद घाली
हसुनि गोडसे बाळा तू पहा एक वेळा ॥३॥

०९ जानेवारी २०१०

बंटीऽ खूष हुवा !!

ताई, अग ऐक नं, मला घालणार म्हणे पाळण्यात
अग्गं म्हणजे एग्झॅक्टली काय गं करतात त्यात?

घात्लं होता का गं त्यात तुला पण कधी?
शाळेत जाय्ला लाग्तं का ग पाळण्यात जायच्याआधी?

सगळ्या म्हणत होत्या पाच नावं ठेवाय्ची
काय ग अस्सं केलंय म्हणून शिक्षा मी घ्यायची?

तूच न ठरवलं होतंस नाव माझं 'बंटी'
क्का म्हणून बद्लाय्चं ते? सांग नं? कशासाठी?

म्हणतात बंटी र्‍हाइम नै होत कुण्णाच्या नावाशी
काय ग देणं घेणं अस्तय नावाचं नावाशी?

माइताय तुला ? बाबांचंऽ नाव आप्ल्या 'सिद्धार्थ'
म्हणून नाव मला आता देणार आहेत 'पार्थ'!

सिद्धार्थचा पार्थ असं म्हणणार म्हणे मला
तशीच का गं अनूची बनू केली तुला?

वॉव! हो की ! नाव तुझं र्‍हाइम होतय आईशी
कित्ती क्लेव्हर बाय्का ग या नावं ठेव्तात अश्शी!

"हॅट्स ऑफ" कसं करू? टोपरं नाही लूज
सांग नाव आवडलं! नि बंटी हुवा खूष!!

०४ जानेवारी २०१०

कुरकुर बंटीबाबांची

अगं आई, किती जरी मोट्ठं तुझं घर
आधीच्या घराची माझ्या त्याला नाही सर!

एकच रूम होती पण सेल्फ कंटेन्ड होती
डेडीकेटेड स्विमिंगपूल पण होता माझ्यासाठी

हातपाय हलवत मनासारखा पोहायचो गं मज्जेत
इथं सदान्कदा मला कपड्यात गुंडाळतेस

ए सी नाय्तर हीटर ची तुझ्या घरी सक्ती
मला तिथे या गोष्टींची गरजच ग नव्हती

नऊ महिन्यांच्या टेनन्सीत नव्हतं काही रेंट
बाबांच्या पेमध्नं किती कटतात ग पर्सेंट ?

र्‍हायचं होतं मला आण्खी थोडे दिवस तिथं
तुलाच झाली घाई आणि बोलावलंस इथं

म्हट्लं नं की र्‍हाईन आता तुमच्याबरोबर?
बांध्ता कशाला ग मग दुप्ट्यात वरचेवर?

कुणी ना कुणीतरी सारखं उचलुन घेता
जरादेखिल शिंकलो तरी घाबरेघुबरे होता!

ऐक, बाबानी काल आणलाय माझ्यासाठी स्ट्रोलर
चल नेऊन त्यात्नं, दाखव इथ्ला परीसर

०१ जानेवारी २०१०

२००९ - २०१०

२००९, अरे तुझे आभार !
या सगळ्या टरमॉईलमधे माझ्या बरोबर राह्यलास,
कधी आनंदलो तेव्हा माझ्याबरोबर हसलास,
हताश झालो तेव्हा तूही उदास झालास
पण हे रे पट्ठे!
हटला नाहीस बाजूला,
माझी सोबत करत राहिलास.
आभार रे तुझे !

तुला निरोप देताना वाईट नाही वाटत पण !
अरे आम्हा मानवांचे सगळे उपद्व्याप
सहन करणं तुला असह्य होत होतं हे पाह्यलंय मी.
म्हणून म्हणतो, सुटलास तू.
जा, निश्चिंत मनाने जा,
माझ्या शुभेच्छा घेऊन जा
तुला शांती आणि मुक्ती मिळो म्हणून.

आणि २०१०, तुलाही शुभेच्छा रे,
२००९वर जी वेळ आली बघायची
बेइमानी, रक्तपात, अपघात, घातपात
आर्थिक घसरगुंडी, नैत्तिक अध:पात
हे काहीही तुझ्या नशिबात नसावं पहाण्यासाठी
म्हणून.

पण लागणार असेलच पहाणं वर्षानुवर्षासारखं
तर देव तुला अमाप सहनशक्ति देवो
जिची मलाही गरज आहे.

खूपशा शुभेच्छा रे तुला !

पण थोड्याशा ठेऊन घेतो माझ्यासाठी.
कारण
मलाही गरज लागणारच आहे त्यांची.