१४ जून २००९

डोळयात आजला का येते भरून पाणी?

वनमोर नाचतो अन फुलते धरा कणांनी
डोळयात आजला का येते भरून पाणी?

पाऊस भरुनि आला अन सांजवेळ झाली
अंधारल्या दिशांची दुभरी मनेही झाली
का गंधहीन आहे रंजीस रातराणी?
डोळयात आजला का येते भरून पाणी?

गेलास दूरदेशी, सखि एकटी जहाली
बाळांस वाढताना बघण्यात गर्क झाली
हळव्या क्षणी परंतु स्मरते तुझीच गाणी
डोळयात आजला का येते भरून पाणी?

दाटून कंठ आला, अन् बोल बोलवेना
सारंगिच्या सुरांची ती आर्तता रुचेना
आषाढपावसाने का चिंब ही विराणी?
डोळयात आजला का येते भरून पाणी?

१० जून २००९

बाळाची चाहूल

बैस रे प्रिया जरा बिलगुनी असा मला
ऐक लक्ष देउनी काय सांगते तुला

वाटते मलाच की मी जरा जडावले
त्रासदायि भासते उचलणेहि पावले

सूज पावलांवरी वाटतेय का जरा?
उचमळून येतसे जीव होइ घाबरा

काळजी जरा जरा अशी उरात दाटते
कंच कैरि आणि चिंच खाविशि रे वाटते

सांगतात या खुणा काय? तुज कळेल का?
कसे अजाण रे तुम्ही? आम्हीच सुज्ञ बायका

प्रिया, अरे हि लक्षणे आई मी बनायची
स्वप्न, पिता व्हायचे, तुझे खरे ठरायची.

अरे, अरे, पुरे, पुरे, नको करूस नर्तना
बघेल बाळ आतुनी तुझा उतावळेपणा

०८ जून २००९

आधारवृक्ष

सखी, ठाऊक आहे मला,
मी आहे तुझा आधारवृक्ष.

सात पावलं चाललीस माझ्याबरोबर
आणि नंतर बिलगलीस मला वेलीसारखी, तेव्हा म्हणाली होतीस,
"प्रिया, ठाऊक आहे तुला?
या सात पावलांत मी काय मिळवलं ते?
मी मिळवले आहेत सात स्वर्ग "
तेव्हाच ठरवलं होतं मी की मला व्हायचय स्वर्गांतला कल्पद्रुम,
या वेडया वेलीचा आधारवृक्ष.

सखी, ठाऊक आहे तुला?
संसारांतले चटके आणि प्रवाहातले फटके सोसूनदेखील
देवाकडे मागून घेत होतीस मला सात जन्मांसाठी
तेव्हा मीही सांगत होतो त्याला,
"अरे हो म्हण, हो म्हण, हो म्हण,
सातच काय, पुढचे सारेच जन्म आवडेल व्हायला मला
या वेडया वेलीचा आधारवृक्ष."

आणि "सखी, ठाऊक आहे मला,
माझा विचार करत असतेस तेव्हा तुझ्या गालांवर
फुललेली असते मधुमालतीची गुलाबी छटा
आणि रुळणार्‍या कुरळया बटा अभावितपणे सारत असतेस मागे
तेव्हा भासतेस हिरव्या गर्द सळसळत्या पानांची पानवेल
मिठीत बिलगलेली, अपार विश्वासाने,
की मी आहे तुझा आधारवृक्ष.

०७ जून २००९

साता जन्मांसाठी

भाग्यवती ठरले मी जेव्हा सखयाने मजला वरले
अन झाले निर्धास्त तयाच्या मिठीत मी जेव्हा शिरले

नकोच मंचक विसावयाला, मिळो मला त्याचा वक्ष
जसा लतेला आधाराला हवा ताठ कणखर वृक्ष

मिठीत त्याच्या विसावताना नकळत मुख होता वरती
संधी साधुनि उमटवी ठसा ओठांचा ओठांवरती

म्हणे पानवेलीसम ऐसी प्रिये सदा बिलगून रहा
मान वळवुनी मम मुखाकडे असेच डोळे मिटुन पहा

सखयाचे मुखकमल कल्पिते मिटलेल्या डोळ्यामधुनी
अन प्रेमाच्या वर्षावाने पुरी चिंब होते भिजुनी

दयाघना रे हाच मिळो मज वर साता जन्मांसाठी
अन दे ताकत सावित्रीसम यमास धाडाया पाठी

०६ जून २००९

घर सजणाचे

घर सजणाचे कौलारू पण मज ते राजमहाल
..घर सजणाचे...

ही खोली छोटी चौकोनी, जशी कुशल कुणि अभिनयराज्ञी
अंकाअंकामधे भूमिका बदले कौशल्यानी.
ही होते दरबार सकाळी, रात्री रंगमहाल
..घर सजणाचे...

जेथे होते बसणे उठणे, अन आठवणींमधी हरवणे,
जिथुन पियाच्या वाटेवरती डोळे लावुन बसणे
ती चौपाई मजला करते शाही तख्त बहाल
..घर सजणाचे...

साजन माझा राजन आणि मी या साम्राज्याची राणी,
आसुसलो ऐकाया युवराजाची लाडिक वाणी.
दुडदुडत्या पदस्पर्शासाठी आतुर सर्व महाल
..घर सजणाचे...

द्वैत आज होमकुंडामधे जळायचे

तुझ्याकडून शब्द मागुनीहि ना मिळायचे
अन तरीहि अंतरंग मज तुझे कळायचे

जाणतोस ना प्रिया?
तुझ्यात मी समावले,
अन कणाकणामधे...
तुझ्या, भरून राहिले
जोडता अशी मने हे असेच व्हायचे
तार छेडल्याविनाहि सूर रे जुळायचे

आठवांत अजुनही
ती प्रणयाराधने
आणि बोलल्याविना
नजरबंद राहणे
साद घातलीस की पाय रे पळायचे
जिथे असेन तेथुनी तुझ्याकडे वळायचे

संपणार आजला
तहानली अधीरता
वर्षणार शीर्षावर
रे सुमंगलाक्षता
द्वैत आज होमकुंडामधे जळायचे
भरभरून सौख्य जीवनातले मिळायचे

०२ जून २००९

तुझ्या प्रेमरंगात न्हाऊन गेले

कटाक्षात एकाच पाहून गेले
तुझे स्वप्न बघण्यात वाहून गेले

विचारायचे "मी तुला भावले का?"
मनाच्या तळाशीच राहून गेले

जरी बोलले नाहि काही तरीही
खुणेनी तुझे नेत्र बाहून गेले

"उद्या भेट" ऐशा तुझ्या त्या खुणेने
मनाची उलाघाल साहून गेले

कळालेच नाही मला काय झाले
तुझ्या बाहुपाशीं स्वताहून गेले

असे वेड त्या भेटिने लावले की
तुझ्या प्रेमरंगात नाहून गेले