२७ नोव्हेंबर २००९

बनुताईंचा पी जे

बनुताई आता मित्रमैत्रिणींकडून नवीन नवीन पी जे शिकून येतात आणि आई, बाबा, आजोबा, सगळ्याना 'कॅप्टिव्ह ऑडियन्स' करून ऐकायला लावतात. शिष्टसंमत नसतील कदाचित पण बनुताईंच्या वयाची मुलं असले जोक्स खूपच एन्जॉय करतात हे मी पाह्यलंय. हा जोक सांगतानाचं बनुताईंचं अनकंट्रोलेबल खिदळणं ऐकून मला वाटलं, 'शिष्टसंमतीची ऐसी की तैसी' तुम्हाला हा जोक तिच्याच शब्दात सांगायलाच हवा.

बाबा, आत्ता बोला, चॅलेंज माझा घेता काय
कोडं घालणाराय मी उत्तर तुम्ही देता काय?

बघा हं उत्तर येत नस्लं तर उठाबशि काढायची
कोड्यात आहे स्टोरी (खि: खि:) एका मुलगीची

आई, तू नको ऐकू, आज तू आमच्यामध्धे नाहिस
उत्तर फोड्तेस आणि वर हास्तेस म्हणून आज तू ढीस !

हं तर बाबा, ऐका, तिकडुन एक मुलगी आली
झप्झप चालत, पळतच होती कुठं तरी चाल्ली

समोरनं आला माणुस आणि विचाराय्ला लाग्ला
"नाव काय तुझं ? नि घाईनं कुठं चाल्लिस ग बाळा?"

ओळखा बाबा, एका शब्दात उत्तर तिनि काय दिलं
ऐकुन जे माण्साला जोरात हसायला आलं

माझ्या या कोड्याचं तुम्ही, बाबा, उत्तर सांगा
नाय्तर वेताळाच्यासारखं झाडाला उल्टं टांगा
( टीप : बनुताईंच्या प्रत्येक कोड्यात या दोन ओळी असायलाच लागतात. )

नाई हो बाबा, नव्हति ती बनू मॉलमधे चाल्लेली
विसरता कशे अहो ती मुलगी एकच वर्ड बोल्लेली

सांगू उत्तर? नाई, नाई, पैले कबुल करा की हरला,
बाबाऽऽ, (खि: खि:) मुलगी (खू: खू:) बोल्ली होती "शीला"

1 टिप्पणी: