एग्झॅम माझी चालू होती, बर का वैशूमावशी
अभ्यासातनं मला नवती फुरसत म्हणुन कशी !
तश्शी, जशी आर्या होती बिझी, नाइ का तेव्हा ?
सांगा मं मी तुमच्याशी बोलणार होते केव्हा?
संपत आली आता, उद्या पेपर आहे लास्ट
उद्यानंतर असेन फ्री बोलायला बिन्धास्त
काल होता बर का माझा ड्रॉइंगचा पेपर
काढाय्चे होते शीवाजीम्हाराज घोड्यावर
तेवढे काढुन आणखिनपण काढला एक किल्ला
झेंडा सुध्दा काढुन त्याच्या रूफवर ठेवला
म्हाराजांना फायटिंगला जायची होती घाई
म्हणुन दारात उभ्या केल्या म्हाराजांच्या आई
म्हाराजांच्या तोंडापुढं काढला फुगा मोठा
आणि मग फुग्यात लिहलं "मासाहेब, टाटा"
निशा मॅडम हसल्या, म्हटल्या, "लव्हली, इट्स फाईन"
आउट ऑफ टेन, मार्क त्यांनी मला दिले नाईन
आईईग्ग! आहे आरिथ्मॅटिक पेपर अजून बाकी,
आजोबांच्या मते मला झीरो मार्क नक्की
पेपरमध्धे सम्स नकोत यायला म्हणजे झालं
एवढ्यासाठी गॉडला मी आइस्क्रीम प्रॉमिस केलं
-तुमची बनुताई