बनुताईंच्या घरी खूप पूर्वीपासून इंदूबाई नावाची एक हाऊसमेड आहे. वयस्कर आहे. बनूची आई लग्न होऊन घरात यायच्या कितीतरी आधीपासून इंदूबाई कामाला आहे. स्वयपाकात मदत, केरवारा, वगैरे खूप कामे करते. बनूवर खूप माया करते पण का कोणास ठाऊक बनुताईंची तिच्यावर भारी खुन्नस. काहीतरी कारण शोधून त्याना काढून टाकायला लावायचं असा बनुताईंचा प्रयत्न असतो.
आई, पैले इंदूबाईना कामावरनं काढ !
रोज गालगुच्चा घेतात, म्हणतात, "लईऽ ग्वाड"
हात किती खर्खरित, लाग्तात ना गं मला
सांगित्लं तर म्हणतात, "मग पप्पी देशीला?"
माझ्या रूममध्धे पण लुडबूड त्या करतात
चांगले पसरून ठेवलेले गेम्स आवरतात
कोणी सांगित्ले ग त्याना अस्ले उपद्व्याप?
परतपरत मांडण्यामध्धे कित्ती होतो ताप !
शार्पनरमधून पेन्सिलीच्या रिंगा काढल्या होत्या
फुलं म्हणुन वहीवर चिकटवाच्या होत्या
अग्गंऽऽ आज बघ्ते तर टाक्ल्यात टोपलीमध्धे
कशासाठी करतात त्या हे उल्टेसुल्टे धंदे ?
चपात्या तू करतेस गोर्या, गोल, सिल्की मऊ
खाताना त्या वाटते मला किती किती खाऊ !
त्यांच्या चपात्यांचा असतो ऑस्ट्रेलियन मॅप
जाड तर इत्क्या, हाफ सेंटीमीटर स्लॅब !
भाजी आणि आमटी तर तिखटजाळ करतात
ओन्ली तू नि बाबा दोघे मिट्क्या मारत खातात
आजोबांच जाऊ दे, ते एक पक्के कोल्हापुरी
मला हवी अस्ते जरा गोडसरच करी
आणि, बायका गोल साडित टाप् टीप दिस्तात
या मात्र भटजींच्या धोतरासारखी नेसतात
कशासाठी अस्लंतस्लं चालवुन आपण घ्यायच?
कामावर त्याना आता नाईच ठेवाय्चं !
घरची सग्गळी कामे तर तूही करू शकतेस
कशाला मं 'इंदूबाई, इंदूबाई' करतेस ?
'उद्यापासुन नाई यायचं' आज त्याना सांग
नाय्तर माझी कट्टी समज सिक्स मंथ लाँग
१९ नोव्हेंबर २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
फारच सुंदर आहेत कविता.
उत्तर द्याहटवाफोटोपण छान आहेत.
आवडली..!!
- गंगाधर मुटे