१८ सप्टेंबर २००९

बनुताईंची ट्रीप

पन्हाळ्याची ट्रीप संपवुन जेव्हा बनुताई आल्या
खरचटलेल्या, विस्कटलेल्या तरिही 'एक्साइट्लेल्या'

क्काऽऽय आणी कित्त्ती मज्जा सांगावी सगळ्याना
म्हणून नव्हती उसंत बनूताईंच्या शब्दाना.

"कित्त्ती मज्जा केली म्हाइताय आम्ही ट्रीपमध्धे ?
येता जाता गाणी पण किति म्हटली बसमध्धे.

थंडी वाज्ली, कडकडून ग भूक पण लाग्लेली
टिफिन खाल्ल्यावर सगळ्यानी फिरायला सुर्वात केली

आई, हिस्ट्रीबुक मध्धे पण आहे पन्न्हाळा
कित्त्ती जागा दाखवल्या टीचरनी आम्हाला

सजा कोठडी नावाचे ग दगडी घर एक तेथे
संबाजीला बाबानि त्याच्या प्रिझनर ठेवले होते

अग, शिवाजी म्हाराज संबाजीचे बाबा होते
म्हण्तात संबाजीने त्यांचे काय्तरि ऐक्ले नव्हते

बाबा, संबाजीचे बाबा होते का हो वाईट ?
करत कशी होते मग वाइट लोकांशी ते फाईट ?

आजोबा, तिथं मोठ्ठा स्टॅच्यू होता बाजिप्रभूंचा
नाइ का तुम्मी गोष्ट त्यांची कितिदा सांगायचा?

आणि आई, तिथं होता एक बुरुज पिसाटीचा
तबकवन गार्डन आणि विष्णूकुंडहि पाण्याचा

कुंड म्हण्जे वेल गऽऽ, डब्ल्यू ई एल्लेल् वेऽऽल
पाणी गार पण टीचर म्हटल्या ड्रिंकिंग् ला अन्वेल

आण्लय तिथनं तुझ्यासाठि मी कढिलिंबाचं झाड
वॉटरबॉटल्मध्धे ठेवलय पाणी ओतुन काढ

अग्ग, टाकू नको नं काठी ती आहे माझी तल्वार
फत्तेसिंगने दिले मला, ती शाळेत आहे मी नेणार"

बोलुनबोलुन थकल्या तेव्हा झोपुन गेल्या ताई
झोपेतदेखिल तल्वार त्यांच्या हातातुन सुटली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा