१० सप्टेंबर २००९

बनुताई 'मिस् वर्ल्ड'

(दोनएक दिवसांपूर्वीची गोष्ट. मी असेच काही लिखाण करत असताना बनुताई आल्या आणि दोन्ही हात मागे धरून माझं लक्ष जाईपर्यंत निमूटपणे उभ्या राहिल्या. मी विचारलं 'काय बागड्-बन्-बनुताई, आज काय शिजतंय डोक्यात?' तशा त्या म्हणाल्या," आजोबा तुम्मी मोठे असून माझ्यावर ल्हीलेल्या कविता बालकवितांमधे छापता. आता मी मोठ्ठ्यांच्यावर कविता ल्हिली तर ती कुठं छापणार?" मी म्हटलं,"त्यात काय बनुताई? तुम्ही छोट्या, पण तुमची कविता आपण मोठ्ठ्यांच्या कवितांमधे छापायला देऊ. घेतली तर घेतील ते" तशा बनुताई थोडा वेळ गप्प उभ्या राहिल्या आणि नंतर मागे लपवलेला एक कागद माझ्यापुढे करून म्हणाल्या, "ठीकाय, मं ही घ्या माजी कविता". आणि धूम मचाले गात पसार झाल्या. ही त्यांची कविता:)

बाबा मला म्हणतात 'बनुताई झिपरी', आई म्हणे 'मिच्कुल्या डोळ्यांची'
काकाना दिसतंय नाक अपरं तर मामा म्हणे वजनात दोन् तोळ्यांची

मावशी नि काकी, दोघीना बाकी, जरा तरी आहे माझी कदर
घरि जाते त्यांच्या, तेव्हा मीठ मिर्च्यानी काढायची म्हणतात हिची नजर

आत्याबाई आईला म्हणतात "कशाला उचलुन आणलित कुणाची"
आजोबाच एकटे बागड-बन-बनूला म्हणतात 'बनुताई गुणाची'

मिच्कुल्या डोळ्यांचि, झिपर्‍या केसांचि, अपर्‍या नाकाची मला म्हणता ?
खोटारडे कुठले! मं गालांची माझ्या उठसूट पप्पी का घेता ?

म्हणाऽऽल तेव्हा, ... होईन मी जेव्हा, मिस् इंडिया नि मिस् वर्ल्डऽऽ
"अरे, याच बनूला म्हणायचे आपण कि 'कैच्च्या कैच आय हिचं रुपडं' "

मी बाई तव्वर फोटो माझा कुण्णालाच मुळि नाई द्यायची
अहो नायतर माझ्या नाकाची, डोळ्यांची, झिपर्‍यांचि जगभर कॉपि व्हायची

तुम्माला म्हणुन मी दाखवते फोटो जो माझा नाही, आहे माझ्या मैत्रिणिचा
फायनल्मधे, किनी, वायदा केलाय तिनी, रनर अप माझी ठरण्याचा.



ही न? केटी आंटीची सरी आहे. जरा माज्यासारकीच आय कीनै आजोबा?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा