06 November 2009

बनुताईंचं ड्रॉइंग

एग्झॅम माझी चालू होती, बर का वैशूमावशी
अभ्यासातनं मला नवती फुरसत म्हणुन कशी !

तश्शी, जशी आर्या होती बिझी, नाइ का तेव्हा ?
सांगा मं मी तुमच्याशी बोलणार होते केव्हा?

संपत आली आता, उद्या पेपर आहे लास्ट
उद्यानंतर असेन फ्री बोलायला बिन्धास्त

काल होता बर का माझा ड्रॉइंगचा पेपर
काढाय्चे होते शीवाजीम्हाराज घोड्यावर

तेवढे काढुन आणखिनपण काढला एक किल्ला
झेंडा सुध्दा काढुन त्याच्या रूफवर ठेवला

म्हाराजांना फायटिंगला जायची होती घाई
म्हणुन दारात उभ्या केल्या म्हाराजांच्या आई

म्हाराजांच्या तोंडापुढं काढला फुगा मोठा
आणि मग फुग्यात लिहलं "मासाहेब, टाटा"

निशा मॅडम हसल्या, म्हटल्या, "लव्हली, इट्स फाईन"
आउट ऑफ टेन, मार्क त्यांनी मला दिले नाईन

आईईग्ग! आहे आरिथ्मॅटिक पेपर अजून बाकी,
आजोबांच्या मते मला झीरो मार्क नक्की

पेपरमध्धे सम्स नकोत यायला म्हणजे झालं
एवढ्यासाठी गॉडला मी आइस्क्रीम प्रॉमिस केलं

-तुमची बनुताई

02 November 2009

आता अतीत आहे

सांगायला हवे का माझेच गीत आहे?
शब्दात ओतले ते माझे गुपीत आहे

हळव्या क्षणांमधे मी जे सोशिले मनाने
ते श्राव्य-शब्द रूपामध्ये प्रतीत आहे

ठावे तुलाहि तेव्हा मी जीव जडवलेला
मानून की तुझीही मजवरच प्रीत आहे

चुकले कळून जेव्हा ना पाहिलेस वळुनी
रंभा मदालसांची ऐसीच रीत आहे

धक्का असा मिळाला की सैरभैर झालो
मेटाकुटी मनाला मी सावरीत आहे

अजुनी स्मरून प्रीती त्या भाबड्या मनाची
आयुष्य आजही मी करतो व्यतीत आहे

शब्दांतुनी कळावे मी काय भोगले ते
म्हणशील तू जरी तो आता अतीत आहे

12 October 2009

बनुताईंची दिवाळी

बाबा, तुमी आकाशकंदिल कधी करणाराय?
आई, कानवल्याना सुर्वात कधी होणाराय?
ओऽ गॉड ! बाबा रोजच येतात उशीरा
कोण जाणे आईचा आळस कधी जाणाराय ! १

आजोबानाच सांग्ते आता कंदिल करायला
जग्गात त्तस्सा कुण्णाचाच नको असायला
सुचित्राच्या बाबानी विकत आणलाय, ईऽऽ
आजोबांचा कंदिल नंबर व्वन असणाराय ! २

आणि आई, माझा ड्रेस अजुन आला नाई
त्याच्यावर मॅचिंग पर्स पण हवी मला बाई
तुझ्यासारखी नथ पण घेशिल का ग मला?
मी पण नाकात घालुन ती मिर्रवणाराय ! ३

चकल्या करशील पण पुडाच्या वडयांचं काय?
आजोबांच्या फेवरिट त्या, तुला पण माइताय
कोतंबीर निवडायला तुला मदत मी करीन
बघ हंऽ? केल्या नाईस तर मी कट्टी करणाराय ४

आणि आई, बाबांसाठी घे न काय तरी
तुला पाडव्याला ते देणारायत जुवेलरी
बाबा आपले बिचारे कधीच नाहीत मागत
सांग न त्याना तू यावेळी काय देणाराय? हं? काय देणाराय? ५

04 October 2009

बनुताई, इरा आणि 'हडिप्पा'

मॉलमध्धे काय झाली गम्मत, आजोबा, माइताय का?
अहो आम्हाला भेट्लं तिथं कोण ओळखा?…प्रकाशकाका !!

काकांच्या पोटावर बांधलेली कांगारूची पोटली
पोटलित होती एक छान अन गुटगुटीतशी गठली

काकानि मला ओळखले हं ! म्ह्ण्ले, "हाय् बनुताई"
मी पण म्हटले, "हाय्" पण गठली मुळीच बोलली नाई

डोक्याला तिच्या होते गुबगुबित एस्कीमोचे बॉनेट
गोलगोल डोळ्यानी बघतच र्‍हायली माझ्या डोळ्यात थेट

काका हसले आणि म्हणाले, "मीट हर, शी इज इरा;
आणि इरा, या बनुताई बरं का. बघ तरि यांचा तोरा !"

डुच्कन हलली मान अन इरा हसली बोळके उघडुन
इवल्या हातात पटकन् माझे बोट तिने ठेवले पकडुन

काका म्हटले, "इराला 'धुम मचाले' शिकवाल का?"
आईच बोलली, "थांबलय ते; आता घोष आहे 'हडिप्पा' "

30 September 2009

बनुताईंच्या सबबी

बाइ, बाईऽ आज होणाराय उठायला उशीर
सांगावे का कपाळाची उठली होती शीर?

आपला साध्या पोटदुखीवर नाई भरवसा
बघायलाच हवा रेड झालाय का घसा

रात्री पासुन पाठ, पाय दुखवावेत काय?
का डोळ्याना आप्ल्या टायर्ड ठरवावे काय?

जेवणात होते श्रीखंड मस्त, अजुन आहे सुस्ती
"बनूऽऽ, शाळा!" ऐकू येताच झोपच येते नुस्ती

"एक्स्क्यूजेस का?" म्हण्ता?, माझे होमवर्क नाई झाले
सोने वाटायच्या भरात राहूनच गेले

टीचर रागावल्या की रडू येते डोळे भरून
रहावे का घरीच आज शाळेला दांडी मारून

आई आहे खमकी, काही ऐकायची नाही
शक्कल नवी लढवायला हवी आता काही

बाबा होतात फितुर अन मलाच रागवतात
द्यावे झाले मॅटर आता आजोबांच्या हातात

पप्पीची नि मिठीची द्यावी जराशी लाच
गालावर घासुन गाल गळ्यात टाकावा हात

बोलावं, "ऑज्योबॉ ऑज शॉळेत जॉय्चं नॉय"
म्हणतिल, "एव्हढंच? हात्तिच्या ! ओक्के बनुताय"

23 September 2009

बनुताईंच्या पार्टीची तयारी

आईऽऽ, माझ्यापण मित्राना कधी ग बोलवायचं?
घरी बोलवुन हळदीकुंकू सगळ्याना द्यायच ?

तुझ्या मैत्रिणी कशा ग येतात हळदीकुंकवाला ?
बोलवायचय ना मलाहि नासिर, ऋषी नि मेरीला

लिली, धनंजय, संजू, अंजुम, फत्ते नि अनिकेत
हे पण माझे बेस्ट्फ्रेंड् तेव्हा बोलवायचे आहेत

नायतर करुया का ग सत्तेनारायण पूजा ?
काकांच्या घरि झाली तेव्हा कित्ती नं मज्जा ?

कशी नं साधू ट्रेडरची शिप समुद्रात बुडली ?
वाइफनि त्याच्या प्रसाद खाल्यावर वरती आली ?

प्रसाद पण किति मस्तच अस्तो नै का ग आई ?
शिरा गुलगुलित गोड मला किति आवडतो बाई !

(पण) खाय्ला मिळाय्ला सगळी स्टोरी लागते ऐकाय्ला…
नै चालणार हंऽऽ! आधीच पायजेत शिरा वडे द्यायला

नकोच नायतर; बोलव माझ्या बर्थेडेच्या दिवशी
सगळे येतिल, प्रेझेंट्स देखिल मिळतिल छानशी

अग पण माझा हॅपी बर्थ्डे कधि येतो ते सांग
कॅलेंडरमधि बघतेस का ? की देउ तुला पंचांग ?

बाबा, वर्षानेच कसा हो येतो माझा बर्थडे ?
एव्हरी मंथ अस्तो नै का हो दोन तारिखचा डे ?

18 September 2009

बनुताईंची ट्रीप

पन्हाळ्याची ट्रीप संपवुन जेव्हा बनुताई आल्या
खरचटलेल्या, विस्कटलेल्या तरिही 'एक्साइट्लेल्या'

क्काऽऽय आणी कित्त्ती मज्जा सांगावी सगळ्याना
म्हणून नव्हती उसंत बनूताईंच्या शब्दाना.

"कित्त्ती मज्जा केली म्हाइताय आम्ही ट्रीपमध्धे ?
येता जाता गाणी पण किति म्हटली बसमध्धे.

थंडी वाज्ली, कडकडून ग भूक पण लाग्लेली
टिफिन खाल्ल्यावर सगळ्यानी फिरायला सुर्वात केली

आई, हिस्ट्रीबुक मध्धे पण आहे पन्न्हाळा
कित्त्ती जागा दाखवल्या टीचरनी आम्हाला

सजा कोठडी नावाचे ग दगडी घर एक तेथे
संबाजीला बाबानि त्याच्या प्रिझनर ठेवले होते

अग, शिवाजी म्हाराज संबाजीचे बाबा होते
म्हण्तात संबाजीने त्यांचे काय्तरि ऐक्ले नव्हते

बाबा, संबाजीचे बाबा होते का हो वाईट ?
करत कशी होते मग वाइट लोकांशी ते फाईट ?

आजोबा, तिथं मोठ्ठा स्टॅच्यू होता बाजिप्रभूंचा
नाइ का तुम्मी गोष्ट त्यांची कितिदा सांगायचा?

आणि आई, तिथं होता एक बुरुज पिसाटीचा
तबकवन गार्डन आणि विष्णूकुंडहि पाण्याचा

कुंड म्हण्जे वेल गऽऽ, डब्ल्यू ई एल्लेल् वेऽऽल
पाणी गार पण टीचर म्हटल्या ड्रिंकिंग् ला अन्वेल

आण्लय तिथनं तुझ्यासाठि मी कढिलिंबाचं झाड
वॉटरबॉटल्मध्धे ठेवलय पाणी ओतुन काढ

अग्ग, टाकू नको नं काठी ती आहे माझी तल्वार
फत्तेसिंगने दिले मला, ती शाळेत आहे मी नेणार"

बोलुनबोलुन थकल्या तेव्हा झोपुन गेल्या ताई
झोपेतदेखिल तल्वार त्यांच्या हातातुन सुटली नाही.