३० सप्टेंबर २००९

बनुताईंच्या सबबी

बाइ, बाईऽ आज होणाराय उठायला उशीर
सांगावे का कपाळाची उठली होती शीर?

आपला साध्या पोटदुखीवर नाई भरवसा
बघायलाच हवा रेड झालाय का घसा

रात्री पासुन पाठ, पाय दुखवावेत काय?
का डोळ्याना आप्ल्या टायर्ड ठरवावे काय?

जेवणात होते श्रीखंड मस्त, अजुन आहे सुस्ती
"बनूऽऽ, शाळा!" ऐकू येताच झोपच येते नुस्ती

"एक्स्क्यूजेस का?" म्हण्ता?, माझे होमवर्क नाई झाले
सोने वाटायच्या भरात राहूनच गेले

टीचर रागावल्या की रडू येते डोळे भरून
रहावे का घरीच आज शाळेला दांडी मारून

आई आहे खमकी, काही ऐकायची नाही
शक्कल नवी लढवायला हवी आता काही

बाबा होतात फितुर अन मलाच रागवतात
द्यावे झाले मॅटर आता आजोबांच्या हातात

पप्पीची नि मिठीची द्यावी जराशी लाच
गालावर घासुन गाल गळ्यात टाकावा हात

बोलावं, "ऑज्योबॉ ऑज शॉळेत जॉय्चं नॉय"
म्हणतिल, "एव्हढंच? हात्तिच्या ! ओक्के बनुताय"

२३ सप्टेंबर २००९

बनुताईंच्या पार्टीची तयारी

आईऽऽ, माझ्यापण मित्राना कधी ग बोलवायचं?
घरी बोलवुन हळदीकुंकू सगळ्याना द्यायच ?

तुझ्या मैत्रिणी कशा ग येतात हळदीकुंकवाला ?
बोलवायचय ना मलाहि नासिर, ऋषी नि मेरीला

लिली, धनंजय, संजू, अंजुम, फत्ते नि अनिकेत
हे पण माझे बेस्ट्फ्रेंड् तेव्हा बोलवायचे आहेत

नायतर करुया का ग सत्तेनारायण पूजा ?
काकांच्या घरि झाली तेव्हा कित्ती नं मज्जा ?

कशी नं साधू ट्रेडरची शिप समुद्रात बुडली ?
वाइफनि त्याच्या प्रसाद खाल्यावर वरती आली ?

प्रसाद पण किति मस्तच अस्तो नै का ग आई ?
शिरा गुलगुलित गोड मला किति आवडतो बाई !

(पण) खाय्ला मिळाय्ला सगळी स्टोरी लागते ऐकाय्ला…
नै चालणार हंऽऽ! आधीच पायजेत शिरा वडे द्यायला

नकोच नायतर; बोलव माझ्या बर्थेडेच्या दिवशी
सगळे येतिल, प्रेझेंट्स देखिल मिळतिल छानशी

अग पण माझा हॅपी बर्थ्डे कधि येतो ते सांग
कॅलेंडरमधि बघतेस का ? की देउ तुला पंचांग ?

बाबा, वर्षानेच कसा हो येतो माझा बर्थडे ?
एव्हरी मंथ अस्तो नै का हो दोन तारिखचा डे ?

१८ सप्टेंबर २००९

बनुताईंची ट्रीप

पन्हाळ्याची ट्रीप संपवुन जेव्हा बनुताई आल्या
खरचटलेल्या, विस्कटलेल्या तरिही 'एक्साइट्लेल्या'

क्काऽऽय आणी कित्त्ती मज्जा सांगावी सगळ्याना
म्हणून नव्हती उसंत बनूताईंच्या शब्दाना.

"कित्त्ती मज्जा केली म्हाइताय आम्ही ट्रीपमध्धे ?
येता जाता गाणी पण किति म्हटली बसमध्धे.

थंडी वाज्ली, कडकडून ग भूक पण लाग्लेली
टिफिन खाल्ल्यावर सगळ्यानी फिरायला सुर्वात केली

आई, हिस्ट्रीबुक मध्धे पण आहे पन्न्हाळा
कित्त्ती जागा दाखवल्या टीचरनी आम्हाला

सजा कोठडी नावाचे ग दगडी घर एक तेथे
संबाजीला बाबानि त्याच्या प्रिझनर ठेवले होते

अग, शिवाजी म्हाराज संबाजीचे बाबा होते
म्हण्तात संबाजीने त्यांचे काय्तरि ऐक्ले नव्हते

बाबा, संबाजीचे बाबा होते का हो वाईट ?
करत कशी होते मग वाइट लोकांशी ते फाईट ?

आजोबा, तिथं मोठ्ठा स्टॅच्यू होता बाजिप्रभूंचा
नाइ का तुम्मी गोष्ट त्यांची कितिदा सांगायचा?

आणि आई, तिथं होता एक बुरुज पिसाटीचा
तबकवन गार्डन आणि विष्णूकुंडहि पाण्याचा

कुंड म्हण्जे वेल गऽऽ, डब्ल्यू ई एल्लेल् वेऽऽल
पाणी गार पण टीचर म्हटल्या ड्रिंकिंग् ला अन्वेल

आण्लय तिथनं तुझ्यासाठि मी कढिलिंबाचं झाड
वॉटरबॉटल्मध्धे ठेवलय पाणी ओतुन काढ

अग्ग, टाकू नको नं काठी ती आहे माझी तल्वार
फत्तेसिंगने दिले मला, ती शाळेत आहे मी नेणार"

बोलुनबोलुन थकल्या तेव्हा झोपुन गेल्या ताई
झोपेतदेखिल तल्वार त्यांच्या हातातुन सुटली नाही.

१० सप्टेंबर २००९

बनुताई 'मिस् वर्ल्ड'

(दोनएक दिवसांपूर्वीची गोष्ट. मी असेच काही लिखाण करत असताना बनुताई आल्या आणि दोन्ही हात मागे धरून माझं लक्ष जाईपर्यंत निमूटपणे उभ्या राहिल्या. मी विचारलं 'काय बागड्-बन्-बनुताई, आज काय शिजतंय डोक्यात?' तशा त्या म्हणाल्या," आजोबा तुम्मी मोठे असून माझ्यावर ल्हीलेल्या कविता बालकवितांमधे छापता. आता मी मोठ्ठ्यांच्यावर कविता ल्हिली तर ती कुठं छापणार?" मी म्हटलं,"त्यात काय बनुताई? तुम्ही छोट्या, पण तुमची कविता आपण मोठ्ठ्यांच्या कवितांमधे छापायला देऊ. घेतली तर घेतील ते" तशा बनुताई थोडा वेळ गप्प उभ्या राहिल्या आणि नंतर मागे लपवलेला एक कागद माझ्यापुढे करून म्हणाल्या, "ठीकाय, मं ही घ्या माजी कविता". आणि धूम मचाले गात पसार झाल्या. ही त्यांची कविता:)

बाबा मला म्हणतात 'बनुताई झिपरी', आई म्हणे 'मिच्कुल्या डोळ्यांची'
काकाना दिसतंय नाक अपरं तर मामा म्हणे वजनात दोन् तोळ्यांची

मावशी नि काकी, दोघीना बाकी, जरा तरी आहे माझी कदर
घरि जाते त्यांच्या, तेव्हा मीठ मिर्च्यानी काढायची म्हणतात हिची नजर

आत्याबाई आईला म्हणतात "कशाला उचलुन आणलित कुणाची"
आजोबाच एकटे बागड-बन-बनूला म्हणतात 'बनुताई गुणाची'

मिच्कुल्या डोळ्यांचि, झिपर्‍या केसांचि, अपर्‍या नाकाची मला म्हणता ?
खोटारडे कुठले! मं गालांची माझ्या उठसूट पप्पी का घेता ?

म्हणाऽऽल तेव्हा, ... होईन मी जेव्हा, मिस् इंडिया नि मिस् वर्ल्डऽऽ
"अरे, याच बनूला म्हणायचे आपण कि 'कैच्च्या कैच आय हिचं रुपडं' "

मी बाई तव्वर फोटो माझा कुण्णालाच मुळि नाई द्यायची
अहो नायतर माझ्या नाकाची, डोळ्यांची, झिपर्‍यांचि जगभर कॉपि व्हायची

तुम्माला म्हणुन मी दाखवते फोटो जो माझा नाही, आहे माझ्या मैत्रिणिचा
फायनल्मधे, किनी, वायदा केलाय तिनी, रनर अप माझी ठरण्याचा.



ही न? केटी आंटीची सरी आहे. जरा माज्यासारकीच आय कीनै आजोबा?

०५ सप्टेंबर २००९

बनुताईंची मराठी भाषा

सकाळपासुन आईच्यामागे बनुताई भुणभुण लावी
“ट्रीपआय आमची आफ्टर टुमॉरो, बाबांचि पर्मिशन हवी,

जुनियर, सिनियर के जी जाणार फोर्ट पन्हाळ्याला
टीचरनि सांगलय सगळ्याना ट्वेंटी रुपीज आणायला”

बाबा म्हटले “आपण बनुताई, जाऊ ना गाडीनी
तर म्ह्टल्या त्या “नोऽऽ नं, बाबा आय वाँटु गो बसनी”

“फत्तेसिंग, रुशिकेश, सुचित्रा, संजुहि जाणारैत
अ‍ॅग्री केलंय आजोबानि, ट्वेंटि रुपीज देणारैत”

बाबा झाले तयार रदबदलीने आईच्या
अन मग पारावार न उरला खुशीस बनुताईंच्या

बनुताई बोलतात अशी अस्खलित कॉन्व्हेंटची भाषा
(जरि म्हणती त्या श्लोक रोजचे बिनचुक अक्षरश:)