३० मे २००९

आजच्याहुनी लोक कालचे नक्किच वेडे होते

आजच्याहुनी लोक कालचे नक्किच वेडे होते
शास्त्रांमध्ये, शस्त्रांमध्ये पार पछेडे होते

सत्तावनच्यापूर्वी नव्हती ए के सत्तेचाळिस
ठासणिची बंदुक, कोयते आणि हतोडे होते

नंग्या फकिरासाठी झेलित मस्तकावरी लाठी
मूठ मिठाची घेण्या गेलेले पण वेडे होते

गेल्या काळातही वानवा मध्यस्थांची नव्हती
तरी पिढ्यांच्या पुढे चालतिल असे बखेडे होते

आकाशा चुंबते मनोरे तुम्ही पाहता जेथे
अगदी परवा परवा माझे तिथेच खेडे होते

ज्ञानेशाने वेद वदवण्यासाठी पशु वापरला
जरि तेव्हा पण माणसांमधे बरेच रेडे होते

आज आणखी काल यामधे तसा फरक ना काही
स्वार्थ समोरी येता जग हे अजून वेडे होते

२७ मे २००९

कोणा एका कवीचे ’रेक्वीयम”

डोळे यावे भरुन कुणाचे अलगद पाण्याने
कोणाच्या हृदयात तुटावे माझ्या जाण्याने

रसिकांपाशी आहे माझी एकच ही प्रार्थना
जाताना मज निरोप द्यावा माझ्या गाण्याने

वाङमयचोरीचा माझ्यावर आळ नका घेऊ
धरा भरवसा, केली कविता स्वतंत्र बाण्याने

प्रयास केला रसिकवरांना तृप्त राखण्याचा
अभंग-गाणे-मुक्तछंद वा गजल-तराण्याने

असाल झाला आल्हादित जर रचनांनी माझ्या
जिणे सार्थ, मी म्हणेन, झाले कलम उचलण्याने

शिळेवरी कोरा "देवा, दे तू याला शांती
हसुआसूंचे आसव दिधले आम्हाला ज्याने"

२४ मे २००९

थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा

थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा
आणि ना थांबायचे तर वळण हे टाळून जा

बांधलेल्या चौथर्‍याला कर हळूसा स्पर्श तू
अन्यथा सार्‍या स्मृतीना तू पुरे जाळून जा

चौथर्‍याच्या खालती ती जागते तव चिंतनी
जोजवाया चौथर्‍यावर वस्त्र हे घालून जा

जोवरी जगली, तुझ्यावर लुब्ध होउनि राहिली
तू समजण्याला उशिर केलास ते बोलून जा

मी इथे साक्षीस, ज्याने जीव तिजवर जडविला
मूक माझ्या प्रीतिवरती मौन, रे, पाळून जा

१९ मे २००९

चिरे पाहिले बुरुजाचे

चिरे पाहिले बुरुजाचे ते ढासळले होते
भगदाडांमधि रक्त गडाचे साकळले होते

गतकाळाचा वर्तमान अन् भविष्य जाणवुनी
धैर्य जणू बेलाग गडाचे त्या ढळले होते

गद्दारांनी स्वार्थापोटी विवरे खोदुनिया
मुल्क जाळण्या पलिते नंतर पाजळले होते

समरामध्ये नररत्नांनी जरि केली शर्थ
साम्राज्याचे लयास जाणे ना टळले होते

कर्तबगाराच्या पुत्राने थोडे सावरले
सावरले पण पाश तोवरी आवळले होते

दिमाखात फर्फरणार्‍या त्या भगव्या झेंड्याच्या
जरिपटक्याचे कापड एव्हाना मळले होते

१६ मे २००९

करशील माफ मज तू

आलाप घेववेना, कंठात स्वर वळेना
नग्मा अबोल झाला का हे मला कळेना

बेरंग झालि श्याई, कागद उडून गेला
निस्तेज हुनर पडला अन शब्दही जुळेना

तू कारवां उठविला बेहोश मज बघोनी
गेलीस टाकुनी अन कुणि दोस्तही मिळेना

परिणाम वारुणीचा? वा स्वार्थ मैत्रिणीचा?
की सूड उगवलेला? मज काहिही कळेना

मैफल उठून गेली, घुंगरू तुटून पडले
तरि का अजून प्याला हातातुनी गळेना?

करशील माफ मज तू विसरून जाहले जे
ही आस लावणे मज अजु्नी कसे टळेना?

०२ मे २००९

तू कीर्तिवंत राहे

हे ठाउके मला मी तुज नापसंत आहे
शिशिरासवे कधी का फुलला वसंत आहे ?

गाठू कशी तुला मी तू दूर दूर तेथे
दोघांमधील अपुल्या अंतर अनंत आहे

अन यायचे तरी पण जाणीव टोचणीची
बदनाम मी, तुझी तर कीर्ती दिगंत आहे

होता जरी दिला त्या कीर्तीत हातभार
उल्लेखही न माझा याचीच खंत आहे.

नेहमीच हारले मी, अव्हेरिले यशाने
डंका तुझ्या यशाचा भरुनी समंत आहे

मी पाहते दुरूनी तव सोहळा यशाचा
जय हो तुझा सदा अन तू कीर्तिवंत राहे !