२५ डिसेंबर २००९

बनुताई says,"बंटीबाबा, सॉरी"

बंटीबाबा, सॉरी हं, मी आधी नाई आले
कशी येणार? सर्दीने मी बेजार होते झाले
पप्पी घेत्ल्याशिवाय तुमची र्‍हाय्लीच मी नस्ती
तुम्हाला पण नाई का मग सर्दी झाली अस्ती ?

ब्बाईऽऽ आता दुबईची हवा गार खूप
गुंडाळू तुम्हाला आता दुपट्यात गुडुप
हातपाय काही केल्या हल्वायचे नाही
दुपट्याची गठली सोडवाय्ची नाही

लुकुलुकु डोळ्यानी बघाय्चं नुस्तं
दुदु पिऊन झाल्यावर बर्प द्यायचा मस्त
ओकी ओकी करून कवडी टाकू नका हंऽ
वाढती लागो शिंक येवो घाबरू नका हंऽ

म्हणेल आई "शत्तंऽजिव आणि चिरंऽजीव !"
मीनिंग त्याचा म्हाईताय? "करेक्ट, लाँग लिव्ह"
आणखी थोडे दिवस तुम्ही आईजवळ झोपा
नंतर आपण दोघे मिळुन करुच दंगाधोपा

बरं आता बंटीबाबा, झोपा डोळे झाकुन
तवर येते माय्बोलीवर फेरी मी टाकुन
बघाच, तिथं बनुताई खरड अश्शी काढील,
"का नाई पाठवत ईमेल?" जाब विचारील

२२ डिसेंबर २००९

बंटीबाबांची तक्रार

अग आई बनुताई का गं आली नाई?
कित्ती शोधलं तरी मला दिस्ली कशी नाई?
बोलव न ग तिला जर थांब्ली असेल घरी
ताई माझी कशी? मला बघू दे तरी

तिनंच नं माझ्यासाठी हट्ट होता केला?
म्हणून तर बाप्पा मला "जा तू" म्हणाला
चल नं आई, जाऊया आत्त्त्त्ता आपल्या घरी
ताई माझी कशी? मला बघू दे तरी

बाप्पा म्हण्ला होता, ताई आहे पॉप्युलर
मावश्या, काक्या सगळे करतात प्रेम तिच्यावर
नक्की छान असणार ताई, जशी कुणी परी !
ताई माझी कशी? मला बघू दे तरी

मांडीवर तिच्या मला आहे लोळाय्चं
धुम्म मचाले गाणं तिचं आहे ऐकाय्चं
ऐकाय्चीये मला तिच्या ट्रीपमध्ली स्टोरी
ताई माझी कशी? मला बघू दे तरी

तिच्याकडे पक्षी म्हणे येतात जेवाय्ला
खानाव्ळीत तिच्या तुम्ही अस्ता कामाला
जोक्स तिचे एंजॉय करता म्हणे तुम्ही सारी
ताई माझी कशी? मला बघू दे तरी

ताईबद्दल बोल्ताना बाप्पा नाई थक्ला
"आण्खि सांग्तो आण्खि सांग्तो" सारखं म्हणत र्‍हाय्ला
कामं जरी होती त्याची पेंडिंग कितीतरी.
अश्शी माझी ताई !! मला बघू दे तरी

१७ डिसेंबर २००९

बंटीबाबा टु गॉड

मंडळी, दुबईला आल्यापासून बनुताईंनी स्वत:ला सगळ्या फूड आउट्लेट्सना भेटी देणे, डेझर्ट सफारी, मेट्रोतून प्रवास, मित्रमैत्रिणींची नवीन गँग जमवणे, प्लेग्राउंड्स, थिएटर्स, पार्क्स, शॉपिंग मॉल्सच्या फेर्‍या, आइस्क्रीम, चॉकलेटस् वगैरेंमधे गुंतवून ठेवलंय. नंतर मग शाळेत अ‍ॅडमिशन वगैरे कार्यक्रम आहेतच. त्यामुळे आता कवितांमधे यायला त्याना वेळ नाही मिळणार म्हणतात. "अधीमधीकधीतरी येईन म्हणावे" असा निरोप द्यायला सांगितलंय त्यानी. आणि तुम्हाला रेग्युलरली भेटायची जबाबदारी त्यानी आता 'बंटीबाबा' वर सोपवलीय. बंटी आठवतोय ना तुम्हाला? बनुताईंनी आईकडे खास मागणी केलेला भाऊ? तो आला परवा १४ डिसेंबरला.

थँक्स, सोड हात आता पलिकडे जातो
आतून दिस्ली आई तिला बाहेरून पहातो.

कोण रे या बाय्का आता बाहेर मला नेतायत?
तुझ्या हातामधुन हात माझा सोडवून घेतायत?

हस्तायत सग्ळया, तिकडं आई घामाने निथळते
पण खरं सांगू? अरे, तुझ्याऽऽ पेक्षाऽऽ छाऽऽन दिस्ते !!

येरे तुही थोडा इथे, आईला माझ्या भेट
घाम तिचा पूस आणि मगच जा तू थेट

नाहि नाही गरज माझी ओळख करुन द्याय्ची
बाहेर आलो तेव्हाच हाक ऐकू आली तिची

'ते कोण?' काय विचारतोस? अरे, बाबा माझे ते
रोज नाई का माझ्याशी बोबडे बोलाय्चे?

आईला रोज समजावाय्चे धीर देत देत
आता बघ अवतार ! स्वता तेच गोंधळलेत

आणि माणसाला एका मिठी मारून रडतायत
स्वत: बाबा आहेत तरी त्याला 'बाबा' म्हण्तायत

बाबा का रे बाबांचे ते? बरे वाट्तायत नई?
बघूऽऽ आता लाड माझे पुरवतायत की नाही.

ओके, ओके, नीघ आता, आय नो यू आर बिझी
पण विसरू नकोस मला...मीही ठेविन आठवण तुझी

११ डिसेंबर २००९

बनुताई - ऑफ टु दुबई

क्काऽय म्हणू बई बई माझ्या फर्गेट्फुल्नेस्ला
सांगितलंच नाही की मी चाल्ले दुबईला !

बाबा आणि आजोबांचे जॉब्स आहेत जिथं
आई म्हण्ते आपण पण आता र्‍हायला जायचं तिथं

व्हीसा बीसा काय म्हण्तात ते बाबानी काढ्लंय
आणि एरोप्लेनचं त्यांनी तिकीटहि पाठवलंय

मज्जा वाट्ते काहो प्लेनमध्धे बसायला?
माझ्या तर बई पोटात उठलाय हा मोठ्ठा गोळा

म्हणतात, बांधुन ठेवतात आत सीटशी पट्ट्यानी
हात पण काढायचा नस्तो विण्डोबाहेर कुणी

वाटेत भेटला मून तऽर मग शेकहॅण्ड करणार कसा?
कान हालवतानाच दिस्णार काहो तिथ्ला ससा?

कर्जत लोणावळ्यासारखी लाग्तात का हो स्टेशन्स
सॅण्डविच, वडा नि चिक्कीसाठी धरायला लागेल पेशन्स?

आई म्हणते जेवायला पण सीटवरच देतात
गोर्‍या गोर्‍या होस्टेसिस मग ट्रे उचलुन नेतात

(त्यावरनं आठवलं आई, इंदुबाइना पण नेउया
जवळ घेउन मला काल ग टीअर्स सांडत रडल्या)

आत्या, मावशी, मामी, काकी, मामा आणि काका
तुम्ही देखिल एनी टाइम भेटाय्ला यायचं बरं का

सेटल झाल्यावर मी सांगिन दुबईमधल्या गमती
तोवर पाठवा ईमेल banutaai@gmail.com वरती

०३ डिसेंबर २००९

बनुताईंची खानावळ







(कधी उघडतात हो?)










(येतायत की नाही मालकिणबाई आणि वाढपी?)






(चला, सुरू करूया.)










काय रे, बरं वाटलं का आजचं जेवण?)







(वा. मस्तच आहे)







(पहिली पंगत. का ग? ती ही नाही आली आज अजून?)







(बरं बाई हिचं पोट एव्हढ्यात भरलं.)









(आणखीन वाढा थोडी, मेंबर जादा आलेत.)









(ओक्के, आता जरा बाजरीकडे जाऊया.)









(बघाच कसा सफाईनं पळवतो तुमचा पाव.)

*********

पक्षांसाठी बनुताईंची खानावळ नवीन
खानावळीत कामगार नेमले आहेत बस्स् तीन

बाबा बाजारमास्तर - पाव, बाजरी आणायला
आई आहे खानावळीचा स्टॉक ठेवायला

वाढपी म्हणुन आजोबांची नेमणुक झाली आहे
खानावळीची मालकिण अर्थात बनुताईच आहे

मेंबर झालेत आजवर जवळजवळ वीस
सकाळ दुपार संध्याकाळ पंगती अगणित

चौदा चिमण्या, पिजन्स तीन आणि दोन चकोर
आणखी एक बुल्बुल पण जो आहे भुरटा चोर

उजाडतानाच सकाळी मेंबर होतात हजर
कुणी असतं शांत कुणी लावतं ट्वि ट्वी गजर

चिवचिवाट चिमण्यांचा चालतो भुकेपोटी
बुलबुल अस्तो पोझ घेउन नजर टाकत चोरटी

पिजन्स बोलत नाहित, नुस्ती चालीचाली करतात
चकोर आपले बापुडवाणे बघत उभे राहतात

बनुताई नि आजोबा येतात बाल्कनीत
चकोरांची जोडी अस्ते दार न्याहाळीत

धावत येतात चकोर बनुताईना पाह्यल्यावर
आणि अगदी तुटुन पडतात वाढल्या पावावर

वाकडी मान करून बुल्बुल टिपण नीट साधतो
चकोरांच्या चोचीखालुन पाव उचलुन जातो

संधी पाहून पिजन्स मारतात दोन्हींवरती ताव
बाजरी खाऊन पुन्हा जातात पळवायला पाव

बाजरीवरती चिमण्यांचा हल्लाबोल होतो
बघताबघता भांड्याचा तळ दिसू लागतो

पिण्यासाठी पाण्याचा ठेवला आहे माठ
कधी कधी चिमण्या त्यातच आंघोळ उरकतात

काय म्हणता ? खानावळीत प्राप्ती काय मिळते?
बनुताईंच्या डोळ्यांमध्धे हसू जे फुलते ! !