१८ एप्रिल २००९

मी गोंधळले

मी गोंधळले, माधव कैसा मज राधेला विटला ग
मीरेच्या भजनाने का तो कूजनास मम किटला ग

फरक भक्ति अन् प्रीतीमधला त्याने जेव्हा मज समजविला
मीरेची भक्ती जाणुनिया संशय तो मम मिटला ग ….. मी गोंधळले

माझी त्याची जोडि असावी युगायुगातुन अतुट रहावी
मनिषा मी ही कथिता हरिला तो तर हासत सुटला ग….. मी गोंधळले

“कोणी किति जरी शंका घेइल प्रीत आपुली अतूट राहिल,
तुझ्या नि माझ्यामधे दुजी कुणी नाहिच”, तो मज म्हटला ग….. मी गोंधळले

सहस्त्र गोपींची अनुरक्ती, तरिहि हरीची मजवर प्रीती
ती प्रीती मी पांघरते, जो पांघर कधि ना फिटला ग….. मी गोंधळले

कटाक्ष गोपींचे अन् पूजन - मीरा जे करते त्या अर्पण
त्यांमधुनीही मम प्रीतीला हरि कधिही ना विटला ग….. मी गोंधळले

* एक खुलासा करणे आवश्यक समजतो. राधा आणि मीरा या समकालिन नव्हत्या असा आक्षेप येऊ शकतो. पण इथे फक्त राधेच्या व्यक्तिमत्वात थोडी मत्सराची छटा आणून जरा रंगत वाढवावी (राधा कैसे न जले? सारखी )म्हणून हे Poetic License' घेतले आहे.

१६ एप्रिल २००९

संध्यागीत

पश्चिम ल्याली सौभाग्याचा टिळा कपाळाला
पूर्वेचे घर सोडुनि साजण परतुनिया आला

सलज्ज नवथर वधूसारखी गालांवर लाली
कुणी पहाया नको म्हणुनी का चंद्रकळा ल्याली
खगोलपरिघार्धाचे अंतर चालुनिया थकला
पूर्वेचे घर सोडुनि साजण परतुनिया आला

रूपयौवना पूर्वेचे पण प्रेम तया आहे
अ­पूर्व पश्चिम दिशा श्यामला लोभावुन राहे
दिवसभराची तिची प्रतीक्षा सफल करायाला
पूर्वेचे घर सोडुनि साजण परतुनिया आला

चंद्र चांदण्या अधिर ऐकण्या गूज प्रियतमांचे
सखी जिवाची निशा राखिते गुपित मीलनाचे
प्रिया पश्चिमा तृप्त, दिनमणी तिला न विस्मरला
पूर्वेचे घर सोडुनि साजण परतुनिया आला

१५ एप्रिल २००९

मक्ता गजलेचा

जग लाख गणो वेडयात मला, बस मर्जि तुझी मजवर व्हावी
ही आस मनीची आजवरी अव्यक्त तुला व्हावी ठावी

प्याल्यावर प्याले करिति रिते, पगल्यांना या कुणि सांगावे
चषकाची कैसी मातबरी डोळयातुन मदिरा तू द्यावी

मरणे मजला मंजूर तरी जगतो तो केवळ यासाठी
की कधीतरी तो क्षण यावा अन प्रीति तुझी मज लाभावी

या मैफिलिच्या सम्राज्ञी घे माझा शब्दांचा नजराणा
याहून दुजा सन्मान नको, गीते माझी ही तू गावी

जगतात कुठे कधि नाव न हो, इतुकेच पुरे तू गावे गीत
मक्ता गजलेचा गाताना नावाची याद तुला व्हावी

१२ एप्रिल २००९

दु:खे सदैव अपुली कुरवाळली कशाला ?

निर्माल्यवत फुले ही तू माळली कशाला ?
दु:खे सदैव अपुली कुरवाळली कशाला ?
डोळ्यामधे तुझ्या गे सामावली सदा जी
स्वप्ने हताशतेने चुरगाळली कशाला?

कळले तुला न कधिही की कोण कसे होते
सलगी अशातशांची स्वीकारली कशाला ?
बेफाम वादळाने दोलायमान नौका
दुथडी पुरामधेही हाकारली कशाला ?

बघुनी दुखावलेली, तुज प्रेमभावनेने
मी साथ देऊ केली, नाकारली कशाला ?
ना होय तू म्हणाली, नाहीहि ना म्हणाली
डोळ्यात मात्र मर्जी साकारली कशाला ?

मग धडकत्या दिलाने बांधून धीर थोडा
मनधरणि तदा केली, धिक्कारली कशाला ?
दिङमूढ जाहलो अन माझे मला कळेना
माझी अशी दशा मी स्वीकारली कशाला ?

०६ एप्रिल २००९

येईन मी तेव्हा

तुला भेटण्याची नाही मला अजुन घाई
जोवरी न आज्ञा देवा तुझी मला येई

तुवां धाडिले मज येथे गुंतवुनी नाती
मनामधी भरूनि सारे मोह, क्रोध, प्रीति

तोडु कशी नाती ? सोडू कसे सर्व कांही?
जोवरी न आज्ञा देवा तशी तुझी होई

करी नेटका वेव्हार समजविले होते
गणित निवासाचे माझ्या ठरवियले होते

तुझ्या हिशेबाची जेव्हा जमा-वजा होई
येईन मी तेव्हा देवा तिथे तुझ्या पायी

०२ एप्रिल २००९

बॅट आणि बॉल




एक होती बॅट आणि एक होता बॉल
बॅटकडे बघत म्हणाला "हाय् यू क्यूट डॉल"

"येईन तुझ्याकडे तेव्हा देईन तुला किस्"
बॅटने फिरवले तोंड आणि केले त्याला मिस्

विकेटसना मिळाला चान्स त्यानी जवळ त्याला ओढले
दोघीनी घेतला चुम्मा आणि पायापाशीच पाडले

ओरडले सगळे अम्पायरकडे बघून "हाऊज दॅट"
बॅटसमनबरोबर विजेत्याच्या रूबाबात गेली बॅट

आत्मा श्रेष्ठ असतो

जन्मापासून मॄत्यूपर्यंत शरीर आत्म्याला संभाळून ठेवतं,
आपल्या दुखण्यातदेखील त्याला जपत राहतं
आणि आपले अस्तित्व सपल्यावरच
जाऊ देतं त्याला बाहेर शरीर

पण कॄतघ्न असतो आत्मा
पहिल्या शरीराला सरणावर ठेवले जात असतानाच शोधत असतो
दुसरं रहाण्यासाठी

आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत उरात बाळगतं ज्याला शरीर
तो आत्मा निष्ठुर असतो
कारण शरीरातच राहून शरीराचे चाललेले हाल
तो निर्विकारपणे पहात बसतो
आणि नंतर आपल्या जोडीदाराची चाललेली प्रेतयात्रा बघत
मजेत फिरत रहातो आकाशातून

बरोबरच आहे कारण तेव्हा शरीर निश्चल असतं
तर आत्मा विश्वसंचारी असतो
जो पहिली काया जळायला लागली
की बिनधास्त दुसरीत शिरतो

आत्मा स्वार्थी असतो नि मेलेल्याचे सोयरसुतक नसलेलाही
पण तरीही अछिंदनीय, अजर, अमर आत्मा शरीरापेक्षा श्रेष्ठ असतो.

कलेवराला कोणी शिवत नाही नि स्वत:ला शिवून घेत नाही आत्मा
कारण शरीर अस्पॄश्य नि उच्चस्तरीय असतो आत्मा
उच्चस्तरीय हा अस्पॄश्यापेक्षा श्रेष्ठ असतो
म्हणून आत्मा शरीरापेक्षा श्रेष्ठ असतो
विचारा पंडितांना!