०५ जानेवारी २०११

सेप्रेट कॉट

बाबा माझा फर्स्ट हॅपी बर्थ्डे काल झाला
तेव्हा “बंटी मोठा झाला” तुम्हीच म्हणाला

आई, आता हवी मला माझी सेप्रेट कॉट
तुमच्या दोघांमध्ये माझी लागते पुरी वाट

जागा नस्ते लोळाय्ला तुम्च्या दोघांमद्धे
बाबांच्या पोटात ग मग बस्तात माझे गुद्दे

तुलादेखील लाग्तात नं खायला माझ्या लाथा?
म्हणून तुमच्या दोघात मी झोप्णार नाई आता

हं, पण आभाळ गडगडून पाऊस धुम्म्धार पडेल
आणि मोट्ठ्या आवाजात वीज कडकडेल

नाय्तर बागुलबोवा आला असेल अंधारात
तेव्हा मात्र उडी मारून येईन मी दोघात

घे हं तेव्हा गुर्फटून कुशीत तुझ्या मला
बाबा जाऊ देत तेव्हा आजोबांच्या सोबतीला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा