१२ ऑक्टोबर २००९

बनुताईंची दिवाळी

बाबा, तुमी आकाशकंदिल कधी करणाराय?
आई, कानवल्याना सुर्वात कधी होणाराय?
ओऽ गॉड ! बाबा रोजच येतात उशीरा
कोण जाणे आईचा आळस कधी जाणाराय ! १

आजोबानाच सांग्ते आता कंदिल करायला
जग्गात त्तस्सा कुण्णाचाच नको असायला
सुचित्राच्या बाबानी विकत आणलाय, ईऽऽ
आजोबांचा कंदिल नंबर व्वन असणाराय ! २

आणि आई, माझा ड्रेस अजुन आला नाई
त्याच्यावर मॅचिंग पर्स पण हवी मला बाई
तुझ्यासारखी नथ पण घेशिल का ग मला?
मी पण नाकात घालुन ती मिर्रवणाराय ! ३

चकल्या करशील पण पुडाच्या वडयांचं काय?
आजोबांच्या फेवरिट त्या, तुला पण माइताय
कोतंबीर निवडायला तुला मदत मी करीन
बघ हंऽ? केल्या नाईस तर मी कट्टी करणाराय ४

आणि आई, बाबांसाठी घे न काय तरी
तुला पाडव्याला ते देणारायत जुवेलरी
बाबा आपले बिचारे कधीच नाहीत मागत
सांग न त्याना तू यावेळी काय देणाराय? हं? काय देणाराय? ५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा