बनूताईंच्या निळ्या फ्रॉकला छान छान लेस
पिवळ्या रिबिनीत बांधले सोनेरी केस
गोर्या गोर्या पायांसाठी गुढग्यापर्यंत स्टॉकिंग
'पिक् पॉक्' बूट वाजवत करतात त्या वॉकिंग
एका हातात बाबांचे अन दुसर्यात आइचे बोट...
...धरून चालतात दुडक्या, मिरवत लालगुलाबी ओठ
फुलपाखरू जर दिसले तर मधेच थप्प्कन थांबतात
हात सोडून त्याच्या मागे पकडायला धावतात
लब्बाड फुलपाखरू जाते कुठल्याकुठे उडून
"द्या ना बाबा पकडुन" म्हणत बनुताई बसतात अडून
बाबाना कसलं पळायला येतंय? 'हाफ..हुफ..' करतात
"नाही सापडत मला, बेटा" म्हणत मागे वळतात
बनूताईंच्या गालाचे मग होतात हुप्प फुगे
डोळे येतात डबडबून जर आई भरली रागे
आई आणि बाबांशीपण होते मग कट्टी
हळूच मिळते चॉकलेट, मग बाबांशीच बट्टी
पप्पी घेते आई आणि लागते डोळे पुसू
बनूताईंच्या ओठांतुन मग खुद्कन फुटते हसू
१७ ऑगस्ट २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा