२५ एप्रिल २००९

धरतीची कटिमेखला

नांगरीत जल सरी आखती वेगवती नौका
निळयाशार पाण्यावर उठवित धवल फेनरेखा
लाटांचा हठ पुरा जिरविते पुलिनाची रेती
आवाजावर त्यांच्या उठते टिटवीची गीती
जलचर विश्वाचा पोशिंदा आटायचा ना कधी
धरतीची कटिमेखला जणू अथांग हा जलधी

तीरासम काळजात घुसती लंगर नौकांचे
अग्निबाण कधि भेदन करिती अभ्यंतर याचे
युगे लोटली मंथन करुनी जहर काढल्याला
अण्विंधनविष आज लागते उलट प्यावयाला
तरी कशाची देखिल पर्वा बाळगतो ना कधी
धरतीची कटिमेखला जणू अथांग हा जलधी

इवल्या इवल्या होडया, मचवे, अजस्त्र अन नौका
छातीवर रांगवी, उलटवी कधि साधुनि मौका
कधि अंतर्मन याचेदेखिल उचंबळुन येते
गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करते
वार्‍याच्या नादाने होतो उत्छृंखलही कधी
धरतीची कटिमेखला जणू अथांग हा जलधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा