०९ जानेवारी २०१०

बंटीऽ खूष हुवा !!

ताई, अग ऐक नं, मला घालणार म्हणे पाळण्यात
अग्गं म्हणजे एग्झॅक्टली काय गं करतात त्यात?

घात्लं होता का गं त्यात तुला पण कधी?
शाळेत जाय्ला लाग्तं का ग पाळण्यात जायच्याआधी?

सगळ्या म्हणत होत्या पाच नावं ठेवाय्ची
काय ग अस्सं केलंय म्हणून शिक्षा मी घ्यायची?

तूच न ठरवलं होतंस नाव माझं 'बंटी'
क्का म्हणून बद्लाय्चं ते? सांग नं? कशासाठी?

म्हणतात बंटी र्‍हाइम नै होत कुण्णाच्या नावाशी
काय ग देणं घेणं अस्तय नावाचं नावाशी?

माइताय तुला ? बाबांचंऽ नाव आप्ल्या 'सिद्धार्थ'
म्हणून नाव मला आता देणार आहेत 'पार्थ'!

सिद्धार्थचा पार्थ असं म्हणणार म्हणे मला
तशीच का गं अनूची बनू केली तुला?

वॉव! हो की ! नाव तुझं र्‍हाइम होतय आईशी
कित्ती क्लेव्हर बाय्का ग या नावं ठेव्तात अश्शी!

"हॅट्स ऑफ" कसं करू? टोपरं नाही लूज
सांग नाव आवडलं! नि बंटी हुवा खूष!!

०४ जानेवारी २०१०

कुरकुर बंटीबाबांची

अगं आई, किती जरी मोट्ठं तुझं घर
आधीच्या घराची माझ्या त्याला नाही सर!

एकच रूम होती पण सेल्फ कंटेन्ड होती
डेडीकेटेड स्विमिंगपूल पण होता माझ्यासाठी

हातपाय हलवत मनासारखा पोहायचो गं मज्जेत
इथं सदान्कदा मला कपड्यात गुंडाळतेस

ए सी नाय्तर हीटर ची तुझ्या घरी सक्ती
मला तिथे या गोष्टींची गरजच ग नव्हती

नऊ महिन्यांच्या टेनन्सीत नव्हतं काही रेंट
बाबांच्या पेमध्नं किती कटतात ग पर्सेंट ?

र्‍हायचं होतं मला आण्खी थोडे दिवस तिथं
तुलाच झाली घाई आणि बोलावलंस इथं

म्हट्लं नं की र्‍हाईन आता तुमच्याबरोबर?
बांध्ता कशाला ग मग दुप्ट्यात वरचेवर?

कुणी ना कुणीतरी सारखं उचलुन घेता
जरादेखिल शिंकलो तरी घाबरेघुबरे होता!

ऐक, बाबानी काल आणलाय माझ्यासाठी स्ट्रोलर
चल नेऊन त्यात्नं, दाखव इथ्ला परीसर

०१ जानेवारी २०१०

२००९ - २०१०

२००९, अरे तुझे आभार !
या सगळ्या टरमॉईलमधे माझ्या बरोबर राह्यलास,
कधी आनंदलो तेव्हा माझ्याबरोबर हसलास,
हताश झालो तेव्हा तूही उदास झालास
पण हे रे पट्ठे!
हटला नाहीस बाजूला,
माझी सोबत करत राहिलास.
आभार रे तुझे !

तुला निरोप देताना वाईट नाही वाटत पण !
अरे आम्हा मानवांचे सगळे उपद्व्याप
सहन करणं तुला असह्य होत होतं हे पाह्यलंय मी.
म्हणून म्हणतो, सुटलास तू.
जा, निश्चिंत मनाने जा,
माझ्या शुभेच्छा घेऊन जा
तुला शांती आणि मुक्ती मिळो म्हणून.

आणि २०१०, तुलाही शुभेच्छा रे,
२००९वर जी वेळ आली बघायची
बेइमानी, रक्तपात, अपघात, घातपात
आर्थिक घसरगुंडी, नैत्तिक अध:पात
हे काहीही तुझ्या नशिबात नसावं पहाण्यासाठी
म्हणून.

पण लागणार असेलच पहाणं वर्षानुवर्षासारखं
तर देव तुला अमाप सहनशक्ति देवो
जिची मलाही गरज आहे.

खूपशा शुभेच्छा रे तुला !

पण थोड्याशा ठेऊन घेतो माझ्यासाठी.
कारण
मलाही गरज लागणारच आहे त्यांची.