१४ मार्च २०१०

रे मीत,

रे मीत, ऐक, गाऊन गीत मी करिते अंतर् खुले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले

आनंदी अथवा आर्त, कसाही असो सूर गाण्याचा
मन दिसते त्यातुन, जसा दिसे तळ निर्मळ पाण्याचा
हे उमजुन घे अन ऐक रे जरा गीत गाइलेले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले

तू कधीच नव्हते मला मानले अपुली जीवनसाथी
अन् तरिही होते लोभावुन मी तुझ्याच साथीसाठी
पण सनईच्या त्या तारस्वरानी स्वप्न हिरावुन नेले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले

तो तुझा तृप्त अन् हसरा चेहरा बघताना त्या क्षणी
परतवले होते निर्धाराने मी डोळ्यातिल पाणी
अन सुरेख निवडीचेही औक्षण होते मी केलेले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले

या शब्दसुरामधि समावलेले अंतर्मन उमगावे
अन् तुझ्या अंतरी मीत म्हणुन तरि स्थान मला लाभावे
हे एक मनोगत केवळ आहे मनात बाळगलेले
कुणी कोकिळगायन म्हणो, म्हणो कुणि वाग्वेलीची फुले

०६ मार्च २०१०

फुला रे फुला

फुला रे फुला
तुला हातांचा झुला
पंखा नाही तरी पण
वारा बघ आला

वार्‍याच्या बरोबर
डोल जरासा
आई आणि बाबांशी
बोल जरासा

"अ अ" नि "ब ब"
"ई गि ग्गि गिक्"
रडु नको सारखं
हसायला शिक

आजोबांचं पोट
घोड्याची पाठ
हो स्वार पण तरी
मान ठेव ताठ

हाताची डावली
जर्राशिच मार
चाल्वु नको पायाची
साय्कल फार

बरऽ आता जरासा
हो उपडा
दाखव उचलुन
नागाची फडा

दमला नं आता?
मऽ मांडीवर या
चिडिचुप गिडगुडुप
झोपुन जा

०३ मार्च २०१०

नीज नीज बाळा

कशी येत नाही अजुनी नीज तुला बाळा
गडद रात्र झाली आता तरी पुरे चाळा ॥धृ॥

चिऊ काउ सारे सारे झोपले कधीचे
लावतोस छकुल्या तूही सूर जांभईचे
का रे तरी झोप नाही पांघरीत डोळा ॥१॥

सानुल्या फुला तू आता मीट पाकळ्या या
जरा दे विसावा अपुल्या पंख आणि पाया
आणि पाखरा ये माझ्या बिलगुनी कुशीला ॥२॥

उघड हळुच पापण्याना सकाळी सकाळी
चिमुकल्या मुखाने मजला 'अअ' साद घाली
हसुनि गोडसे बाळा तू पहा एक वेळा ॥३॥