३० ऑगस्ट २००९

बनुताईंची संध्याकाळ

शाळा सुटली म्हणजे बनुताई येतात रिक्शाकडे
सुरेश सांगतो हासत हासत कसे दिसे रुपडे

"सुटलेलि शूलेस, हेअरबँड हातात नि बॅग मागे फरफटतात
विस्कटल्या ड्रेसवर मातीचे डाग, 'डाग चांगले असतात' म्हणतात"

बनुताई येतात हाततोंड धुवुन अन फ्रॉकही बदलून
अजून चालू असते 'धूम मचा ले' ची धून

आई देते गोड शिरा पण दूधहि लावते प्याया
झोपुन थोडे बनुताई होतात तयार खेळाया

पण बाबांचा हुकूम सुटतो 'बनू बस अभ्यासाला'
अन् मग लागे जबरदस्तिने टेबल्स घोकायाला

गरिब बिचार्‍या आजोबांनाच शिक्षा ती खाशी
इथेहि चालते बनुताईंची सॉलिड चापलुसी

"टू वन्जा टू …. टू वन्जा टू …. आजोबाऽऽ, तो बगा आला टांगा;
टू वन्जा टू …. टू टू जा फो ….पन फाय का नाय ? शांगा"

हताश होऊन हात आजोबा डोक्यावर नेतात
धुम मचा ले ओरडत बनुताई तेव्हढ्यात धुम ठोकतात

बाहुली बाहुला, ठिक्करबिल्ला कोण हे खेळेल?
बनुताईंची गँग खेळते क्रिकेट सारा वेळ

दिवेलागणीच्या वेळी मग घरात त्या येती
'दिव्या दिव्या' अन् 'शांताकारम्' बाबांसह म्हणती

रात्री जेवण भरवायाला आजोबाच त्यांना हवे
हट्टापुढती बाबानाही लागे नमते घ्यावे

मउ भाताचे घास आजोबा गोलगोलसे करतात
घास गालात अन् बोबड्या बोलात बनुताई फर्मावतात,

"ऑजोबॉ मॉलॉ पुडच्यॉ घॉशॉत मॉरंबॉ पॉयजेलॉय"
नाही म्हणतिल आजोबा ऐशी बिशात त्यांची काय?

"भात संपव आधि" किचनमधून आई ओरडते
आजोबांचे जाते बोट तोंडावर नि मुरंब्याचि फोड मिळते

झोपताना बनुताई स्वत:च सांगतात आजोबाना गोष्टी
निष्पाप बोलांनी नकळत भिजते आजोबांची दृष्टी

"आजोबा, शांगा न आजीला तुमी हाक काय मालायचा?
बाबा कशे आईला 'चिम्' म्हंतात तशे तुमि काय बोलायचा?"

बनुताईना घेतात जवळ आजोबा नि मायेने थोपटतात
हळु हळु आंगठा चोखत बनुताई निद्रावश होतात

आजीच्या साडीची आजोबानी शिवलेली मऊ उबदार दुलई
तिच्यात स्वत:ला घेऊन गुरफटुन निजतात बनुताई

बनुताईंची शाळा

बनुताई शाळेमधे जायला आता लागल्यात
शाळा आहे राजवाड्याजवळच्या एका बंगल्यात

नाव त्यांच्या शाळेचे होली क्रॉस कॉन्व्हेंट
टीचर मिस हेलन अन् फादर बर्टी व्हिन्सेंट

बनुताईंना खूऽऽपच आवडली आहे शाळा
जामानिमा केलाय् बाबानी सगळा गोळा

काळे शूज, निळा स्कर्ट, पांढराधोप टॉप
लाल हेअर बँड, युनिफॉर्म टिपटॉप

पाठीवरच्या स्कूलबॅगवर सश्याचे तोंड
पाण्याच्या बाटलीला हत्तीची सोंड

टिफिनमधे कधी मफिन, ब्रेडजॅम कधी
तूपसाखरपोळीभाजी असते अधीमधी

मफिन, जॅम, तूपसाखर होते चट्टामट्टा
ब्रेड, पोळीभाजी बनतात कावळ्यांचा वाटा

बसनी जायचं शाळेला हे आईला नाही पास
म्हणून नेण्याआणण्यासाठी रिक्शा आहे खास

रिक्शावाल्या सुरेशची भरते कंबक्ती
"मस्ती नको" म्हणून जेव्हा करतो तो सक्ती

बनुताई दादा बनुन हल्लाबोल करतात
धुडकावून त्याला, हॉर्न वाजऽऽव वाजवतात

२९ ऑगस्ट २००९

जगदंबेची आरती

जय अंबे, जगदंबे, दुर्गे, भवानी
हिमनगदुहिते, माते, गिरिजा, ईशानी … जय देवी जय देवी

षडाननाने वधिले तारकासुराला
तू कोलासुर अन महिषासुराला
पति समवेता तू अन तव पुत्रांनी
रक्षियले विश्वाला खलविनाश करुनी,
जय अंबे, जगदंबे, दुर्गे, भवानी
हिमनगदुहिते, माते, गिरिजा, ईशानी … जय देवी जय देवी

कालीच्या रूपामधि तू क्रोधित दिसशी
रूपामधि अंबेच्या वत्सलमूर्त जशी
आदिमाये डंका तव त्रैलोक्यामधुनी
नाना नामे दिधली तुजला भक्तानी
जय अंबे, जगदंबे, दुर्गे, भवानी
हिमनगदुहिते, माते, गिरिजा, ईशानी … जय देवी जय देवी

य:कश्चित मानव मी तुज वंदन करतो
संकटमोचन करशिल ही इच्छा धरतो
मातेच्या ममतेने घे मज सावरुनी
परिवारावर छाया मायेची धरुनी
जय अंबे, जगदंबे, दुर्गे, भवानी
हिमनगदुहिते, माते, गिरिजा, ईशानी … जय देवी जय देवी

शंकराची आरती

जटा धारिल्या शीर्षावरती झेलियली गंगाधारा
आणि खोविला आभूषणात्मक शीतल शशि कचसंभारा
भालावरल्या नेत्रामधुनी बरसवुनी खदिरांगारा
मदनदहन करूनिया शमविला क्रोध तुवा अतिबलेश्वरा
जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा

विश्वाचा समतोल राखण्या अवलंबिशी तू संहारा
कठोर जितुका तितुका भोळा असशी तू तारणहारा
कर्पुरगोर्‍या अंगांगावर भस्म लेपिशी उग्रतरा
व्याघ्रांबरधारका महेशा, मम वंदन तुज हरेश्वरा
जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा

कंठ तुझा जाहला निळा जधि प्राशन केले हलाहला
दाह तयाचा शमवायाला नाग धारिला जशि माला
तांडवप्रिया, रूद्रनायका, कैलाशपती, त्रिशुलधरा
अर्पण ही आरती चरणि तव नीलग्रीवा पशुपतेश्वरा
जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा

२४ ऑगस्ट २००९

गणपतीची आरती

सुखकारक, दुखहारक, सन्मतिदायक, गणपती मोरया
जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

प्राक्तनातले अरिष्ट नुरवी
प्रेमकृपेची धारा झरवी
वात्सल्याची वर्षा पुरवी
तू गणनायक, सिध्दिविनायक, सुबुध्दिदायक मोरया
जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

राग लोभ अज्ञान काननी
गुरफटलो मज तार यांतुनी
अनन्य भावे शरण तुला मी
दे मज स्फूर्ती आणि सन्मती, अंति सद्गती मोरया
जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

सर्वसाक्षि तू, तू वरदाता
तुजवाचुनि मज कुणी न त्राता
क्लेशांमधुनि सोडवि आता
मी नतमस्तक करित प्रार्थना हे गजवदना मोरया
जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

१७ ऑगस्ट २००९

बनूताईंचा भाऊ

बनूताईंना हवाय आता एक छोटा भाऊ
आईला म्हणतात "आण, त्याचं नाव बंटी ठेऊ.

डोके त्याचे छान चेंडूसारखे दिसावे;
गाल कसे माझ्यापेक्षा गुब्बु असावे;

आई, त्याचे डोळे जरा पिचके असू देत;
जांभई देताना दात नको दिसू देत;

ट्यांहा ट्यांहा भाषेमधे माझ्याशी बोलेल;
काय हवे त्याला मला नक्की समजेल;

हाताशी मी बोट नेता पटकन् पकडू दे;
दोन्ही मुठी तोंडाजवळ घेऊन झोपू दे.

मऊ मऊ दुपट्यात त्याला छान गुंडाळून
देशिल ना ग मांडीवर माझ्या तू ठेऊन?

तुझ्या ओरडण्याने जर जागा होईल बाई
’धुम मचा ले’ गाऊन त्याला करवीन गाईगाई"

(’धूम मचाले, धूम मचाले, धूम’ हे बनूताईंचे फार आवडते गाणे आहे आणि त्या ते आवाज टिपेला नेऊन गातात.)

पुन्हा एकदा बनूताई

बनूताईंच्या निळ्या फ्रॉकला छान छान लेस
पिवळ्या रिबिनीत बांधले सोनेरी केस

गोर्‍या गोर्‍या पायांसाठी गुढग्यापर्यंत स्टॉकिंग
'पिक् पॉक्' बूट वाजवत करतात त्या वॉकिंग

एका हातात बाबांचे अन दुसर्‍यात आइचे बोट...
...धरून चालतात दुडक्या, मिरवत लालगुलाबी ओठ

फुलपाखरू जर दिसले तर मधेच थप्प्कन थांबतात
हात सोडून त्याच्या मागे पकडायला धावतात

लब्बाड फुलपाखरू जाते कुठल्याकुठे उडून
"द्या ना बाबा पकडुन" म्हणत बनुताई बसतात अडून

बाबाना कसलं पळायला येतंय? 'हाफ..हुफ..' करतात
"नाही सापडत मला, बेटा" म्हणत मागे वळतात

बनूताईंच्या गालाचे मग होतात हुप्प फुगे
डोळे येतात डबडबून जर आई भरली रागे

आई आणि बाबांशीपण होते मग कट्टी
हळूच मिळते चॉकलेट, मग बाबांशीच बट्टी

पप्पी घेते आई आणि लागते डोळे पुसू
बनूताईंच्या ओठांतुन मग खुद्कन फुटते हसू

बनूताईंची मनवामनवी


आजोबा माला आणखिन एक चॉकलेट पायजेलाय
द्या नं आजोबा, द्या नं
आई? नाय देत ती. उठत नाई
तुमी द्या नं. द्या नं आजोबा

म माझ्या वेण्या बांधून द्याल ?
आई नाई बांधत. क्लीप लावते नुस्ती
तुमी बांधा. हं अश्शा
बघा. दिल्या नं बांधायला ?
मं आतां द्या चॉकलेट

आजोबा, बघा नं इकडं
भो ऽ ऽ ऽ! नाई घाबलत? नाई घाबलत?
बघा आता मी डोळ्यांचा बागुलबुवा केलाय
घाबललात की नाय? आतां द्या
द्या आता चॉकलेट

आजोबा, तुमी मला काय हाक मालता?
बागड-बन-बनूताई, न?
आता हाक माला, म्हणा, आता म्हणा.
बघा. दिलं न म्हणायला.
म आतां तरी द्या नं माला चॉकलेट
द्या नं आजोबा. द्या नं.

आजोबा, तुमाला एक सांगू?
मला नं ऽ ऽ बाबा इडली खायला नेनाल आएत
तुमाला पन नेईल मी. येनाल?
हापिसातनं आले नं म्हनजे जायचय त्यांच्या गाडीतनं, येनाल?
हं? हं? येनाल काय?
म आता द्या माला चॉकलेट.
द्या नं, द्या नं.

बनुताईंची मेंढी

बनुताईंची होती एक गोरीचिट्टी मेंढी
बर्फासारखी पांढरीफेक लोकरीची गुंडी

बनुताई जातिल जेथे, जाई ही मेंढी
शाळेत जाऊन बसायला बाक पण धुंडी

छोटयाश्या बनूताई

छोटयाश्या बनूताई सतरंजी अंथरतात नि
चमचावाटी हातात घेऊन दही खात बसतात

होते काय गंमत, येते छतावरनं सूत
सुताच्या टोकावर असते एक कोळयाचे भूत

कोळीदादाना येताना बनूताई बघतात, मग
उडते त्यांची घाबरगुंडी वाटी टाकून पळतात

१० ऑगस्ट २००९

"अरे मानवा,"

कुठे देव आहे कसे आकळावे ?
कसा देव आहे कसे आजमावे ?

मसीहा कुणाला कुठे सापडावा,
कसा अन कधी हे कसे उलगडावे ?

तया शोधण्या जायचे दूर कोठे ?
श्रमाने वृथाच्या कशाला दमावे?

रमावे तिथे तू जडे जीव जेथे,
तुला भक्ति ज्याची तयाला नमावे !

असो राम, ईसा, मुसा वा मुहम्मद
तुझ्या अंतरात्म्यामधे तो समावे !

स्वत: तूहि रे अंश परमेश्वराचा
निखळ सत्य हे का न तुजला कळावे ?